बँकेत धनादेश भरल्यानंतर त्याची पोचपावती न दिल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने युनियन बँकेला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्यवसायाने वकील असलेले भगवान रामचंदानी यांनी एक धनादेश बँकेतील खात्यात जमा करण्यासाठी आपल्या वाहनचालकाला पाठवले होते. मात्र युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी धनादेशासोबतच्या भरणा पावतीवर (पे इन स्लिप) स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यानंतर रामचंदानी यांनी आपल्या मुलाला तोच धनादेश देऊन बँकेत जमा करण्यासाठी पाठवले. मात्र त्यालाही स्वाक्षरी देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमानुसार धनादेश स्वीकारल्यानंतर त्याची पोचपावती म्हणून भरणा पावतीच्या स्थळप्रतीवर बँकेचा शिक्का व अधिकाऱ्याची स्वाक्षरी देणे आवश्यक आहे. मात्र युनियन बँकेने गेल्या काही वर्षांपासून भरणा पावतीवर ग्राहकांनीच बँकेचा शिक्का मारून तो ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये जमा करण्याची पद्धत सुरू केली होती. या विरोधात रामचंदानी यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी ‘बँकेचा शिक्का नसल्याने तसेच अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याने खातेदाराकडे धनादेश जमा केल्याचा पुरावा उरत नाही. तसेच असा पुरावा न्यायालय ग्राह्य धरत नाही. प्रसंगी याचा त्याला फटका बसू शकतो,’ असा निर्वाळा देत ग्राहक न्यायालयाच्या न्या. स्नेहा म्हात्रे यांनी रामचंदानी यांचा दावा योग्य ठरवला. तसेच कामात कसूर केल्याप्रकरणी बँकेला रामचंदानी यांना पाच हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.