कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन
tv13पश्चिम महाराष्ट्रात जशी साखर कारखान्यांच्या रूपाने सहकार चळवळ रुजली, तशीच नागरी सहकारी बँकांनी कोकणात सहकाराचे जाळे विणले. त्यातही ठाणे जिल्ह्य़ात नागरी सहकारी बँकांचे मोठे प्रस्थ आहे. शासन आणि रिझव्‍‌र्ह बँकांनी आखून दिलेल्या नियमांनुसार काम करताना भेडसाविणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी कोकणातील बँकांनी तीन दशकांपूर्वी कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली. अलीकडेच या संघटनेचे नवे कार्यालय कल्याण येथे स्थलांतरित झाले. येथे नियमितपणे नागरी सहकारी बँकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.  
कोकणात सहकाराचे विस्तीर्ण जाळे निर्माण केलेल्या नागरी बँकांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था म्हणून कोकण नागरी सहकारी बँक्स या संघटनेची ओळख आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्य़ांमधील सहकारी बँका या संघटनेच्या सभासद आहेत. १९८६ मध्ये कै. शामभाईशेठ (गोरेगाव अर्बन बँक), कै. दादा जगे (अलिबाग अर्बन को-ऑप. बँक. लि.), कै. अ‍ॅड. अण्णासाहेब सावंत (अण्णासाहेब सावंत को-ऑप. बँक. लि.) यांच्या पुढाकाराने ही संस्था स्थापन झाली.
सुरुवातीच्या काळात संघटनेला कार्यालय नव्हते. डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या डोंबिवली पश्चिम विभागातील रेल्वे स्थानकाजवळील शाखेतील छोटय़ाशा जागेतून संघटनेचे कामकाज सुरू झाले. पुढे कल्याण जनता सहकारी बँकेने १९९१-९२ मध्ये जनता भवन, भारताचार्य चौक, कल्याण (प.) येथे स्वत:ची तीन मजली इमारत बांधली. त्या वास्तूत तिसऱ्या मजल्यावर गेस्ट हाऊससारख्या असलेल्या २५० चौरस फुटाच्या स्वतंत्र जागेत कल्याण जनता सहकारी बँकेच्या साहाय्याने संघटनेचे कार्यालय थाटले गेले. त्यानंतर कल्याण जनता बँकेचा व्याप वाढल्याने असोसिएशनसाठी देवधर सदन येथील बँकेचीच टिळक चौक, आय.डी.बी.आय. बँकेसमोर असलेली जागा उपलब्ध करून देण्यात आली. असा प्रवास करत करत अखेर कोकण नागरी असोसिएशनने स्वत:ची अशी स्वतंत्र जागा आधारवाडी, कल्याण (प.) येथे घेतली. गेल्याच आठवडय़ात या नव्या जागेतून संघटनेचे कामकाज सुरू झाले आहे.
 प्रारंभीच्या काळात ३१ नागरी सहकारी बँका संघटनेच्या सभासद बँका होत्या. मात्र गेल्या एक ते दोन वर्षांत रायगड जिल्ह्य़ातील गोरेगाव अर्बन, सिद्धिविनायक, पेण अर्बन या सारख्या बँकांचे परवाने रिझव्‍‌र्ह बँकेने रद्द केले. त्यामुळे सध्या संघटनेत २८ बँकांचा समावेश आहे. कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, मर्यादित ही या २८ नागरी सहकारी बँकांची प्रातिनिधिक संस्था म्हणून कार्य पाहत असते.
सहकार क्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. रिझव्‍‌र्ह बँकलवकरच बँकिंग क्षेत्राची पुनर्बाधणी करणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी बँकांचा सहभाग दुर्लक्षित करता येणार नाही. शेती, किरकोळ व्यापार, लघू-मध्यम आकाराचे उद्योग, शहरी-निमशहरी-ग्रामीण भागातील छोटे उद्योजक यांसारख्या अनेक घटकांना वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था म्हणून ग्राहक सहकारी बँकांकडे आकृष्ट होतो. रिझव्‍‌र्ह बँक तसेच सहकारी बँकांशी समन्वय साधून नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सामूहिकपणे मांडणे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे.
 अलीकडेच (गुरुवार, १९ फेब्रुवारी) रोजी संघटनेचे नवे कार्यालय ४०१, ओम विजयकृष्ण अपार्टमेंट, कल्याण जनता सहकारी बँक मुख्य कार्यालयावर, आधारवाडी, कल्याण (प.) येथे कार्यान्वित झाले आहे. तीस ते पस्तीस कर्मचारी प्रशिक्षणासाठी एका वेळी बसू शकतील, अशी सोय या प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. या नवीन वास्तूचे उद्घाटन वित्त व ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे उपस्थित होते. नॅफकॅबचे अध्यक्ष डॉ. मुकुंदराव अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली रिझव्‍‌र्ह बँकेने भारतीय बँकांच्या पुनर्रचनेसंदर्भात दोन वर्षांपूर्वी काढलेल्या चर्चापत्रकाला अनुसरून ‘भारतभरातील सगळ्या बँकांचे भविष्य व त्याचा सहकारी बँकांवर होणारा परिणाम’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सार्थ कोकण मुखपत्र
संघटनेच्या स्थापनेनंतर ५ वर्षांनी म्हणजे १९९१ मध्ये स्वत:चे मुखपत्र असावे या विचाराने ‘सार्थ कोकण’ हे अनियतकालिक सुरू करण्यात आले. नागरी सहकारी बँकांसंदर्भातील नवे नियम, बँकिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा परिचय, बँकांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अनुभवाचे बोल आदी विषयांच्या लेखांचा या अनियतकालिकामध्ये समावेश असतो. सहकार क्षेत्राविषयी बरीच उपयुक्त माहिती या अंकात असते. या सोहळ्याच्या निमित्ताने यंदाच्या ‘सार्थ कोकण’ या अनियतकालिकाचे प्रकाशन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोकणातील नागरी सहकारी बँकांचे प्रश्न शासनाचे सहकार खाते आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडे मांडणे, सहकारी बँकांच्या संचालकांना तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आदी कामे संघटनेच्या वतीने केली जातात. कोकणातील सभासद बँका त्यांचे प्रश्न आणि समस्या संघटनेकडे मांडतात. या तक्रारी, समस्या संघटना रिझव्‍‌र्ह बँक व राज्यातील सहकार खात्याने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे व संमतीने सोडवतात. बँकेच्या शाखा उघडणे, रिझव्‍‌र्ह बँकेअंतर्गत कर्जाच्या मर्यादा पडताळून पाहणे, रिझव्‍‌र्ह बँकेने आखून दिलेले निरनिराळे सी.आर.आर. (कॅश रिझव्ह रेशो), एस.एल.आर. (स्टॅटय़ूटरी लिक्विडिटी रेशो), सहकारी बँकांची रिझव्‍‌र्ह बँकेकडून योग्य तपासणी होईल हे पाहणे या व अशा अनेक जबाबदाऱ्या संघटना सोडविते.

तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ
चारही जिल्ह्य़ांतील नागरी सहकारी बँकांना रिझव्‍‌र्ह बँक तसेच शासनाच्या सहकार खात्याकडे आपले प्रश्न मांडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. छोटय़ा नागरी बँकांना त्याचा खूपच फायदा झाला. उदाहरणार्थ-राजापूर नागरी सहकारी बँकेकडे बँक म्हणून काम करण्याचे सभासदत्व नसल्याची बाब संघटनेच्या लक्षात आली. त्यानंतर संघटनेने प्रयत्न करून बँकेला ते प्रमाणपत्र मिळवून दिले. रिझव्‍‌र्ह बँक आणि नागरी सहकारी बँक यांच्यातील दुवा म्हणून संघटना काम करते.

कोकणातील बँकांचे योगदान
देशभरातील नागरी सहकारी बँकांच्या एकूण ठेवींपैकी दहा टक्के ठेवी कोकणातील नागरी सहकारी बँकांमध्ये आहेत. अर्थात त्यात ठाणे जिल्ह्य़ाचे मोठे योगदान आहे. कारण कोकणातील २८ बँकांपैकी १८ बँका ठाणे जिल्ह्य़ात आहेत. भविष्यात नागरी सहकारी बँकांची ही चळवळ अधिक सशक्त व्हावी म्हणून बँकांच्या कारभारात तांत्रिक सुधारणा करणे, कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे आदी कामे संघटनेच्या माध्यमातून केली जाणार आहेत. अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँकेचे संस्थापक विलास देसाई संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.  
समीर पाटणकर