रोहित्र बिघडल्याने वीज खंडित

बारवी धरणग्रस्तांच्या मागण्या अद्याप प्रलंबित असताना येथील आदिवासी बांधव सध्या अंधारात दिवस काढत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून  येथील रोहित्र बिघडल्याने आदिवासींना दिवाळी अंधारातच काढावी लागेल, अशी शक्यता आहे. किमान वीजपुरवठा तरी सुरळीत करावा, अशी विनंती आता येथील आदिवासी करत आहेत.

बारवी धरणग्रस्तांचे प्रश्न गेल्या १३ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. मोबदला म्हणून जी घरे, नोकऱ्या देण्याचे आश्वासन मिळाले होते, ती घरे आणि नोकऱ्या त्यांना अजून मिळालेल्या नाहीत. त्यात पाण्याची पातळी घराच्या उंबऱ्याशी आल्याने शेती, जलसाठे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बारवी काठी असूनही त्यांचे पिण्याचे पाण्याचे हाल आहेत. या वाढलेल्या पाण्यामुळे अनेकदा साप, विंचू असे घरात घुसतात. त्यामुळे रात्री अपरात्री धोका उद्भवू शकतो. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रही दूर असल्याने त्याचे परिणाम प्राणघातक ठरू शकतात. त्यामुळे किमान रात्रीच्या वेळी वीज असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून काचकोलीजवळील मारकवाडी, बुरूडवाडी, जांभळवाडी आणि देवपाडा येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या सर्व रहिवाशांना एकच रोहित्र असल्याने त्यावर ताण आल्यास हे रोहित्र बिघडते. त्यामुळेच ऐन नवरात्रोत्सवात वीजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या पाच ते सात दिवसांपासून वीज नसल्याने आदिवासींना अंधारातच दिवस काढावे लागत आहेत.

दिवाळी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असतानाही विजेच्या संदर्भात काही हालचाली होत नसल्याने यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. किमान दिवाळीपूर्वी विजेचा प्रश्न सोडवण्याची मागणी आदिवासी करत आहेत.

काचकोली आणि आदिवासी पाडय़ांची विजेची मागणी अधिक आहे. मात्र तरीही अवघ्या ६३ किलोव्हॅट क्षमतेचे रोहित्र येथे लावण्यात येते. त्यामुळे त्यावर ताण आल्यास ते बिघडते. काचकोली येथे जवळपास ४०० विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. काचकोली आणि इतर चार पाडे पाहता त्यांची मागणी अधिक असल्याने किमान १०० किलोव्हॅटचे रोहित्र लावणे आवश्यक आहे.

– मनोहर बांगारा, माजी सरपंच.