जुन्या काळातील छायाचित्रकारांना ग्लॅमरचे आकर्षण नव्हते, असे मत ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने यांनी येथे व्यक्त केले. ऑगस्ट महिन्यातील जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून कल्याणातील सुभेदारवाडा कट्टय़ाच्या वतीने रविवार १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार मोहन बने आणि संदेश भंडारे यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जुन्या काळात छायाचित्रकारांचे काम छायाचित्र काढण्यापुरते मर्यादित नव्हते. छायाचित्र काढण्यापासून ते संपादकांना संबंधित कामाविषयी कल्पना देण्यापर्यंत सर्व प्रक्रियेतून संबंधित छायाचित्रकाराला जावे लागत असे. कदाचित जुन्या काळातील छायाचित्रकारांना ग्लॅमरचे आकर्षण नव्हते, असे बने यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. जुन्या काळातील छायाचित्रकारांच्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘डार्क रूम’ असायची. कॅमेरात छायाचित्र टिपल्यानंतर ते डार्क रूममध्ये जाऊ न तयार करावे लागे आणि सर्व प्रक्रियेनंतर त्याची प्रिंट काढावी लागे. डार्क रूममधील छायाचित्र तयार करण्याची प्रक्रिया जिकिरीची असल्याने छायाचित्रकारांमध्ये उत्कृष्टता असणे गरजेचे होते, असे ते यावेळी म्हणाले. सॅबी फर्नाडिस, विनायक गोखले आणि एस. पॉल हे आपले गुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांची छायाचित्रे बघत मी या क्षेत्रात वाटचाल करत गेलो, असे ते म्हणाले. राजकारण आणि क्रीडा या विषयातील छायाचित्रांमध्ये बने यांचा हातखंडा आहे. या विषयातील बने यांची अनेक छायाचित्रे देश-विदेशात गाजली. बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजपटू अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक पटकावलेले छायाचित्रही त्यांपैकीच एक होते.
यावेळी बोलताना प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी प्रत्येक छायाचित्रामागे अनेक अर्थ दडलेले असतात, असे मत व्यक्त केले. दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करणारा एक ब्राह्मण माणूस, पंढरपूरच्या वारीदरम्यान चंद्रभागेत स्नान करणारा एक वयोवृद्ध अशी भंडारे यांच्या कॅमेराने टिपलेली वैविध्यपूर्ण छायाचित्रे यावेळी दाखवण्यात आली. या छायाचित्रांमधून त्यामागे दडलेला अर्थ या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्यांना उलगडत गेला. संदेश भंडारे यांनी आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून पंढरपूरची वारी, तमाशा या लोककलांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. पंढरपूरच्या वारीने माणसाला नातेसंबंधांपलीकडील समानता, आयुष्यात कसे वागले पाहिजे आदी गोष्टी शिकवल्या, असे भंडारे म्हणाले.