फटाक्यांच्या आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण किती त्रासदायक ठरते, याची नागरिकांना जाणीव व्हावी म्हणून येत्या गुरुवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वागळे इस्टेट रायलादेवी तलाव परिसरात ध्वनी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनेच मोठय़ा प्रमाणात फटाके वाजविले जाणार आहेत. बाजारात बाराही महिने फटाक्यांची विक्री होत असली तरी दिवाळीत त्याचे प्रमाण सर्वाधिक असते. साहजिकच याच काळात ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो. २००० मध्ये ध्वनिप्रदूषणाच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या गेल्या. मात्र मुळात प्रदूषणाचे नियम पाळून फटाके बनविले आहेत की नाही, हे फटाके वाजवून पाहिल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या साक्षीने हे फटाके फोडण्याचा कार्यक्रम मंडळाने जाहीर केला आहे. या कार्यक्रमामुळे एकाच वेळी फटाक्यांची तपासणी आणि लोकांमध्ये जनजागृती होईल. त्यामुळे शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थित राहून ध्वनिप्रदूषणाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन ठाणे विभागीय प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी केले आहे.