गुंडापुंडांच्या टोळय़ांवर कारवाई; अनेक ठिकाणी सीसीटीव्हींचा पहारा

महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी भिवंडी शहरातील बंदोबस्तात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून तब्बल ५६ गुंडांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. शहरातील प्रमुख नाक्यांवर सीसीटीव्हींचा पहारा ठेवण्यात येणार आहे. पैसा आणि गुंडांच्या वावरामुळे भिवंडीतील निवडणुका नेहमीच वादग्रस्त ठरतात. हा अनुभव गाठीशी असल्याने पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारावर तपासणी नाके उभारण्याचे ठरवले आहे. या ठिकाणी तंबू ठोकून पोलीस शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर नजर ठेवणार आहेत.

भिवंडी महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होणार असून निवडणुकीची रणधुमाळी शहरात सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून, त्यांनी शहरातील गुंडापुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक काळात मतदारांमध्ये दहशत पसरवण्यासाठी गुंडांचा तसेच मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैशांचा वापर होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या पाश्र्वभूमीवर भिवंडी पोलिसांनी गुंडापुंडांचा आणि पैशांचा वापर निवडणूक काळात होऊ नये म्हणून शहराच्या प्रवेशद्वारावर तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी शहरातील साईबाबा मंदिर, ममता रुग्णालय, नदीनाका, कारवली आणि ओसवालवाडी या पाच ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे पथक तैनात केले जाणार आहे. या नाक्यांवर तंबू उभारून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत, अशी माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. निवडणूक काळात पैशांचा व गुंडांचा वापर होऊ नये म्हणून तपासणी नाक्यांवर पथक बारीक लक्ष ठेवणार आहे. एखादे वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले तर त्या वाहनाची तपासणी केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

२६ गुंड तडीपार

भिवंडी महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी आणि नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे, यासाठी पोलिसांनी शहरात दहशत माजविणाऱ्या गुंडांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत चार टोळ्यांमधील ५६ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज म्हात्रे यांची हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे याच्यासह १९ आरोपींचा समावेश आहे. भिवंडीतील गुंड सुमन झा व त्याचे दहा साथीदार आणि भरत पाटील या टोळ्यांचाही यात समावेश आहे. याशिवाय, २६ गुंडांना तडीपार करण्यात आले आहे, तर नऊशेहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

प्राप्तिकर विभागाची पाच पथके

भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी प्राप्तिकर विभागाची पाच पथके तैनात करण्यात येणार असून ही पथके निवडणूक काळात उमेदवारांकडून होणाऱ्या पैशांच्या वापरावर बारीक लक्ष ठेवणार आहेत.