मंगळवार, बुधवार, शुक्रवार गोदामे बंदचे जिल्हा प्रशासनाचे आदेश 

ठाणे परिसरात काही दिवसांपूर्वी उद्भवलेल्या महाकोंडीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भिवंडी परिसरातील गोदामांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडय़ाच्या प्रत्येक मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी परिसरातील गोदामे टप्याटप्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भिवंडीतील गोदाम मालक, व्यापारी तसेच भिवंडी पोलीसांशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. गोदाम असोसिएशनने देखील या बैठकीत कोणत्या दिवशी गोदामे बंद ठेवता येतील याची सविस्तर चर्चा करून माहिती दिली होती. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी भिवंडीतील गोदामांच्या वेळापत्रकातील बदलाचा निर्णय सुचवल्यानंतर भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी याविषयी सविस्तर माहिती घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे भिवंडीतील गोदामामुळे ठाणे शहराच्या आणि परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळण्यास मदत होऊ शकणार आहे.

नवी मुंबईच्या जेएनपीटीमधून भिवंडीच्या गोदामांकडे जाणाऱ्या वाहनांच्या मोठय़ा संख्येमुळे भिवंडी महामार्ग गेल्या काही महिन्यांपासून महाकोंडीच्या अडचणीचा सामना करत आहे. वाहनांच्या रांगा तासन्तास महामार्गावर उभ्या राहात असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

यातून मुक्तता मिळवण्याच्या दृष्टीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. त्यावेळी भिवंडी महामार्गावरील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी भिवंडीतील गोदामांच्या वेळापत्रकात बदल करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ संतोष थिटे यांनी भिवंडी गोदामे मालक, व्यापारी तसेच भिवंडी पोलीस यांच्याशी चर्चाही केली होती.