ठाण्यात ५० पक्ष्यांवर उपचार; ससाणा, घार, घुबडांचा समावेश

मे महिन्यात उष्माघाताने त्रस्त असलेल्या पक्ष्यांना आता पावसाचा माराही सहन करावा लागत आहे.  मुसळधार सरींमुळे पक्षी जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाळी हंगामात पक्ष्यांची रोगप्रतिकारक शक्ती मंदावते. परिणामी त्यांनाही साथीच्या आजारांचा त्रास होतो. यंदाच्या पावसाळ्यात ठाण्यातील घोडबंदर परिसर, डोंबिवली, मुलुंड आणि भांडुप आदी परिसरातून ससाणा, पानबगळे आदींसारख्या ५० दुर्मीळ पक्ष्यांना ठाणे एसपीसीए,  तसेच डोंबिवली येथील ‘पॉज’ या संस्थेत उपचारासांठी दाखल करण्यात आले आहे.

यंदा उशिरा सुरू झालेल्या पावसाने गेल्या दीडेक महिन्यांत जोर पकडला आहे. पावसाच्या माऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने त्यावरील पक्ष्यांची घरटी नष्ट झाली. या माऱ्याने अनेक पक्षी जखमी होत असून काही पक्ष्यांना न्यूमोनियासारख्या आजाराची लागण झाल्याचेही आढळून आले आहे. पावसाने गारठलेल्या या पक्ष्यांना प्राणिमित्रांनी ठाण्यातील ब्रह्मांड येथील पशू-प्राण्यांवर उपचार करणाऱ्या एसपीसीए आणि डोंबिवली पूर्व येथील पॉज या संस्थेत उपचारार्थ दाखल केले. गेल्या १० ते १५ दिवसांपासून एसपीसीए या संस्थेत साधारणत: ३० दुर्मीळ पक्षी उपचार घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ससाणे आणि घारींचा समावेश आहे. २२ ससाणे आणि घारींसह ६ घुबड आणि २ पानबगळ्यांनाही पावसाचा त्रास झाला आहे. उपचारानंतर या पक्ष्यांना येऊर, कर्नाळा किंवा ज्या परिसरातून आणले तेथे सोडले जाणार आहे. पॉज या संस्थेत जुलै महिन्यात २० वेगवेगळ्या जातीचे पक्षी उपचारासाठी दाखल आहेत. यामध्ये तांबे लोहार, भारतीय जातीचे घुबड, काळी घार, किंगफिशर, पोपट, लव्ह बर्डस असे अनेक पक्षी उपचारासाठी येत आहेत. यामध्ये दोन सापही आढळले.

या पक्ष्यांची नाजूक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांना शक्तिवर्धक टॉनिक, जीवनसत्त्वे औषधांद्वारे देण्यात येत आहेत. त्याचबरोबर या संस्थेच्या रुग्णालयात वेळप्रसंगी जखमी झालेल्यांवर शस्त्रक्रिया किंवा मलमपट्टी करण्यात येत आहे.

-डॉ. सुहास राणे, पशु-पक्षी वैद्य

पावसाळय़ात अनेक पक्षी घरटय़ात अंडी घालतात; पण त्यातील अंडी सोसाटय़ाच्या वाऱ्याने फुटतात. भिजलेल्या पक्ष्यांना एका पिंजऱ्यात ठेवून ऊ ब दिली जाते.  त्यामुळे घराच्या खिडकीत भिजून निवारा घेण्यासाठी आलेल्या पक्ष्याला आवर्जून निवारा द्यावा.

-डॉ. नीलेश भणगे, पॉज