विशेष चौकशी व्यवस्थापन समितीचा निर्णय
नापास विद्यार्थ्यांला पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले साहाय्यक प्राध्यापक भीमराव खरात यांना बिर्ला महाविद्यालयाने निलंबित केले आहे. महाविद्यालयाच्या वतीने नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी व्यवस्थापन समितीने एकमताने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महाविद्यालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
बिर्ला महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी दोन विषयांत नापास झाला होता. या विषयात पास करण्यासाठी राज्यशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक भीमराव खरात यांनी त्याच्याकडे चार हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दोन हजार देण्याचे ठरले. विद्यार्थ्यांने याविषयी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर १७ मे रोजी प्राध्यापक खरात यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. बिर्ला महाविद्यालयाने ही घटना घडताच दुसऱ्याच दिवशी तातडीने व्यवस्थापन समितीची बैठक बोलावली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी व्यवस्थापन समितीचे सुबोध दवे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. यात वरिष्ठ उपप्राचार्य स्वप्ना समेळ, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. गोरखनाथ शिखरे यांचा समावेश होता.
या समितीने दिलेल्या अहवालानुसार खरात यांना साहाय्यक प्राध्यापक या पदावरून तसेच महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे. लाचलुचपतप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्य़ाच्या अनुषंगाने पोलीस तपासात बिर्ला महाविद्यालय सर्वतोपरी मदत करेल असेही व्यवस्थापन समितीने स्पष्ट केले आहे.