कल्याण-डोंबिवलीत शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेला मात्र यश

‘राज्यात अन्य कोणत्याही शहरांमध्ये मते पडली नाही तरी कल्याण व डोंबिवली या शहरांमध्ये भाजपला हमखास मते आणि यशही मिळत गेले’, असे मत विनोद तावडे यांनी विकास परिषदेत मांडले असले तरी गेल्या २० वर्षांंमध्ये भाजपच्या या पारंपारिक बालेकिल्ल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने यश मिळविले, मनसेने मुसंडी मारली, पण भाजपला मर्यादित यशावरच समाधान मानावे लागले आहे.

कल्याण हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला मानला जायचा. कृष्णराव धुळप यांच्यासारख्या शेकापच्या मातब्बर नेत्याचे वर्चस्व होते. गेल्याच आठवडय़ात निधन झालेले माजी खासदार प्रा. राम कापसे यांच्या जनसंघाच्या माध्यमातून शेकापला शह दिला आणि भाजपचे प्रस्थ प्रस्थापित केले. नारायणराव मराठे, भगवानराव जोशी यांच्यासारख्या नेत्यांच्या त्यांना साथ लाभली. डोंबिवली हा पारंपारिकदृष्टय़ा जनसंघाचा बालेकिल्ला मानला जायचा. डोंबिवलीतील एकगठ्ठा मतांच्या जोरावर ठाणे लोकसभा आणि कल्याण विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या यशाचा मार्ग मोकळा व्हायचा. मुंबईतील जागेचे भाव गगनाला भिडले आणि १९९०च्या दशकात कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये बाहेरील ओघ वाढला. हळूहळू राजकीय चित्र बदलत गेले आणि आनंद दिघे यांनी शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. १९९६ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने भाजपकडून काढून घेतला आणि तेव्हापासून ठाणे जिल्ह्यात भाजपला जी ओहोटी लागली ती गेल्या वर्षी मोदी लाटेत भाजप सावरला.

महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत म्हणजे १९९५ मध्ये शिवसेनेने यश मिळविले. २००० मध्येही शिवसेनेचाच भगवा फडकला, अर्थात भाजप दुय्यम भूमिकेत राहिला. २००५ मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसने कल्याणची सत्ता पटकावली. डान्सबार बंद केल्याने तेव्हा आर. आर. पाटील यांच्याबद्दल भलतेच आकर्षण होते. डोंबिवलीतील भाजपच्या बालेकिल्ल्यात व विशेषत: ब्राम्हणबहुल प्रभागात राष्ट्रवादीला यश मिळाले होते. २०१० मध्येही शिवसेनेने भाजपला मागे टाकले आणि पुन्हा एकदा महापौरपद पटकविले. गेल्या निवडणुकीत डोंबिवलीमध्ये मनसेला यश मिळाले. शिवसेनेबरोबरच भाजपची पारंपारिक मते मनसेकडे तेव्हा वळली होती.

भाजपसाठी अवघड वाट

मोदी लाटेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपला यश मिळाले. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना कल्याण आणि डोंबिवली हे दोन्ही शहरी मतदारसंघांत भाजपला विजय मिळाला. यामुळेच भाजपच्या महापालिका निवडणुकीत अपेक्षा वाढल्या आहेत. शहराच्या विकासाकरिता साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याने काही प्रमाणात फरक पडू शकतो. पण भाजपला तेवढे सोपे नाही. शिवसेनेची तळागाळापर्यंत घट्ट बांधणी आहे. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून पुंडलिक म्हात्रे यांच्या महापौरपदाची कारकीर्द वगळता सातत्याने शिवसेनेची सत्ता राहिली आहे. कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांचा फार काही विकास झालेला नाही. नागरी समस्या आहेत तशाच आहेत. सुनील जोशी वा सुरेश पवार यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पालख्या उभारण्यात शिवसेनेनेसह साऱ्याच राजकीय पक्षांनी धन्य मानले.

आत्मपरीक्षणाची गरज

राज्यात कोठेही नसली तरी कल्याण आणि डोंबिवलीमध्ये भाजपला मते मिळालची हे विनोद तावडे यांचे निरीक्षण बरेच बोलके असले तरी ही मते का वाढत नाहीत याचेही भाजपला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.