डोंबिवलीतील बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे; गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी न देण्याची मागणी

पालिका निवडणुकांमध्ये नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपकडून डावलण्यात येते. उमेदवारी देताना टाळाटाळ केली जाते. असे संघाच्या येथील कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. संघ कार्यकर्त्यांच्या मनातील तगमग विश्वसनीय भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचविल्या होत्या. त्यामुळे विकास परिषद संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तपणे पेंडसेनगरमधील कानविंदे व्यायामशाळेच्या सभागृहात संघाच्या मोजक्याच मंडळींबरोबर बैठक घेतली. पाऊण तास ही बैठक सुरू होती, असे एका विश्वसनीय सूत्राने सांगितले.

डोंबिवलीचे टिळकनगर, रामनगर, पेंडसेनगर, राजाजी रोड, मानपाडा रस्ता, ब्राह्मण सभा परिसरात संघ परिवारातील मंडळी मोठय़ा संख्येने आहेत. कोणतीही निवडणूक आली की, संघाला फक्त दुय्यम स्थान देऊन भाजपच्या येथील नेतृत्वाकडून वापरले जातेय, अशी संघातील येथील कार्यकर्त्यांची कुरबुर होती.

आर्थिक परिस्थिती, गटबाजीची कारणे देऊन त्यांच्या उमेदवाऱ्या कापण्यात आल्या आहेत. मागच्या काही वर्षांत तर भाजप आणि संघ असे दोन तट निवडणुकीच्या वेळी पडले. पाच वर्षांपूर्वी भाजपच्या एककल्ली कारभाराला दणका देण्यासाठी संघ परिवारातील मंडळींनी मनसे नेत्यांच्या आर्जवावरून भाजपच्या डोंबिवलीतील उमेदवारांना पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही सगळी पाश्र्वभूमी मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आली आहे.

कोणत्याही परिस्थितीत संघाच्या अधिकाधिक उमेदवारांना पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली गेली पाहिजे. कोणत्याही गटातटाचे राजकारण यासाठी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याचे भाजपच्या एका विश्वसनीय सूत्राने सांगितले. त्यामुळे डोंबिवलीत आल्यानंतर मोजक्याच संघ परिवारातील मंडळींशी त्यांनी हितगुज केली. भाजपच्या एकाही पदाधिकारी, लोकप्रतिनिधीला या ठिकाणी वाव नव्हता.

भाजपमधून गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या लोकांना पालिका निवडणुकीसाठी पुढे केले जात आहे. त्यामुळे पक्षाचेही नुकसान होत असल्याचे भाजपमधील निष्ठावान गटाचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांचे कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीवर  लक्ष असल्याने त्यांनी डोंबिवलीत आल्यावर संघ कार्यकर्त्यांची भेट घेतली.

कार्यपद्धतीवर नाराजी

गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा शहरातील कारभार एककल्ली व एकहाती झाला आहे. या एककल्ली कारभारावर संघाची अनेक मंडळी नाराज आहेत. संघ सूत्रामुळे ही मंडळी निवडणुकीच्यावेळी भाजपला मदत करत आली आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला एकहाती मतदान करण्यात संघाने प्रभावी भूमिका बजावली. परंतु, हा संघ परिवारातील मतदार पालिका निवडणुकीसाठी जेव्हा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडे उमेदवारीसाठी जातो, त्यावेळी त्यांना डावलण्यात येते.