ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांची राजीनाम्याची धमकी

शिवसेनेला धक्का देत गोकुळनगर परिसरातील नगरसेविका नंदा पाटील आणि त्यांचे पती कृष्णा यांना गळाला लावत भाजपचे स्थानिक नेते गुरुवारी खुशीची गाजरे खात असतानाच पाटील पती-पत्नीच्या प्रवेशामुळे अस्वस्थ झालेले वंृदावन परिसरातील भाजपचे मातब्बर नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी पाटलांना दोन जागा सोडल्यास मी पक्ष सोडेन असा इशारा पक्षश्रेष्ठींना दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पाटणकरांची ही नाराजी पक्षाच्या मुळावर येऊ शकते हे लक्षात येताच त्यांची समजूत काढण्यासाठी नेत्यांची तारांबळ उडाली आहे.

श्रीरंग आणि वृंदावन परिसरात पाटणकर यांचा वरचष्मा राहिला असून नव्या प्रभाग रचनेत गोकुळदासवाडी, आझादनगर, हंसनगर, परेरानगर, कोलबाडचा काही परिसर मिळून एक प्रभाग तयार झाला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना पाटील दाम्पत्याने चारपैकी दोन जागांवर दावा केला असून राष्ट्रवादीतून भाजप प्रवेश करणारे प्रशांत गावंड यांच्यासाठी एक जागा सोडण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. चारपैकी तीन जागा परपक्षातून येणाऱ्या उमेदवारांना सोडण्यास पाटणकर यांनी तीव्र विरोध केला आहे.  भाजपमधील ही अस्वस्थता लक्षात घेऊन शिवसेना नेतेही सक्रिय झाल्याचे वृत्त आहे.

एकेकाळी निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असणारे कृष्णा पाटील आणि त्यांच्या पत्नी नंदा शिवसेनेतील स्थानिक घडामोडींमुळे अस्वस्थ होते. त्यांची ही अस्वस्थता ओळखून ‘महाराज’ने त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला असला, तरी प्रवेश करताना त्यांनी दोन जागांवर दावा सांगितल्याने मिलिंद पाटणकर कमालीचे नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांच्याशी दोन हात करत पाटणकर वृंदावन, श्रीरंग भागातून सलग निवडून येत असतात. महापालिकेतील पक्षाचा अभ्यासू चेहरा अशी त्यांची ओळख आहे. नंदा पाटील यांना प्रवेश देताना त्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याने त्यांनी यासंबंधी नाराजी श्रेष्ठींकडे व्यक्त केल्याचे बोलले जाते. पाटील दाम्पत्य आणि प्रशांत गावंड अशा तीन जागा बाहेरून आलेल्या उमेदवारास दिल्या गेल्या तर आपण पक्षाचा राजीनामा देऊ, अशी निर्वाणीची भूमिका त्यांनी मांडल्याचे बोलले जाते.

केळकर, लेलेही अंधारात

राज्यात सत्ताबदल होताच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आयारामांची संख्या कमालीची वाढली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मर्जी संपादन करणारा एक माथाडी नेता जिल्ह्य़ातील राजकारणात भलताच सक्रिय झाला आहे. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असणारा हा वादग्रस्त नेता सध्या फोडाफोडीच्या राजकारणात अग्रभागी असून पाटील दाम्पत्याला थेट वर्षांवारी घडविण्यात ‘महाराज’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या प्रवेशादरम्यान, भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांनीही वर्षांवारी टाळल्याने पक्षातील मतभेदांच्या चर्चेने जोर धरला आहे.

मी भाजपचा निष्ठावान आहे आणि अनेक वर्षे महापालिकेत पक्षाचे प्रतिनिधित्व करतो आहे. परपक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे स्वागतच आहे. मात्र, त्यांना उमेदवारी देत असताना मूळ निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार व्हायला हवा एवढेच माझे म्हणणे आहे.

मिलिंद पाटणकर, ज्येष्ठ नगरसेवक, भाजप