शिवसेना-भाजप युतीचे यापूर्वी सरकार असताना ‘सामना’तून अनेकदा टीका करण्यात आली होती, यामुळे सामनातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्दय़ावर नुकतेच केलेल्या टीकेवर काय प्रतिक्रिया देणार, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शिवसेनेच्या टीकेला फारसे महत्त्व दिले नाही.
भाजप सदस्य अभियानाची माहिती देण्यासाठी शनिवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सामनाच्या टीकेवर असा प्रतिप्रश्न केला. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची युती होणार का, या प्रश्नावरही त्यांनी अजून घोडा मैदान लांब असून प्रत्येक पक्ष आपल्या जागा वाढविण्याचा प्रयत्न करतो, असे सूचक विधानही केले.
ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांच्या व्यंगचित्राला पुष्पहार अर्पण करणाऱ्या भाजपच्या वादग्रस्त जाहिरातीबाबत पत्रकारांनी विचारले असता, गेले दोन दिवस प्रवासात असल्याने याविषयी आपणास माहिती नसल्याचे सांगत त्यांनी याविषयी अधिक बोलणे टाळले.  
बलाढय़ पक्षाचे ध्येय
चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे सर्वात जास्त आठ कोटी सदस्य असून हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे.  भाजपची सदस्यसंख्या आठ कोटींपेक्षा जास्त करून पक्षाला जगातील बलाढय़ पक्ष करण्याचे आमचे ध्येय आहे, असे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.