ठाणे महापालिका मुख्यालयात भाजपचे धरणे

‘ठाण्यात शिवसेना-जयस्वाल मिलीजुली.. खाऊ दोघे मिळून मलई’ अशी बोचरी घोषणा करत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयात धरणे आंदोलन केले. भाजपच्या आंदोलनाचा रोख शिवसेनेकडे असला तरी यातून आयुक्त जयस्वाल यांना लक्ष्य करण्याची संधीही भाजपने साधली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील अधिकारी अशी ओळख असलेल्या जयस्वाल यांच्यावर भाजपने निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. जयस्वाल यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल ही भ्रष्ट युती असल्याचा आरोपही भाजपकडून या वेळी करण्यात आला.

ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत तब्बल ३५० हून अधिक प्रस्तावांना विनाचर्चा ४० मिनिटांत मंजुरी देण्यात आली. ठाणे शहरात आयुक्त म्हणून गेल्या दोन वर्षांत कामाचा ठसा उमटविणारे जयस्वाल यांनी या सभेत मांडलेले काही प्रस्ताव कमालीचे वादग्रस्त ठरले आहेत. भाईंदर पाडा परिसरात ३५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा मैदानासाठी आरक्षित असलेला भलामोठा भूखंड एका बडय़ा बिल्डरला ३० वर्षांच्या भाडेपट्टय़ावर देताना यापुढे शहरातील मैदानेही खासगी विकासकांना खुली करण्याचे धोरण जयस्वाल यांनी सर्वसाधारण सभेपुढे मांडले. मुंबईत राजकीय नेते आणि त्यांच्या संस्थांनी बळकावलेली मैदाने परत घ्यावीत यासाठी भाजपचे नेते आग्रह धरत असताना ठाणे महापालिका प्रशासनाने यासंबंधीचा प्रस्ताव मांडून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी विनाचर्चा या प्रस्तावांना मंजुरी दिली. या निषेधार्थ भाजपच्या नगरसेवकांनी गटनेते मिलिंद पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी मंगळवारी मुख्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन सुरू करत थेट आयुक्त आणि पालकमंत्र्यांवर टीकेचे आसूड ओढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळिकीमुळे भाजपचे स्थानिक नेते आयुक्त संजीव जयस्वाल यांना फारसे अंगावर घेत नाहीत असे चित्र नेहमी दिसत असे. या वेळी मात्र भाजपच्या नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीका करताना थेट आयुक्तांवर निशाणा साधल्याने महापालिका वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘एकनाथ अधिक संजीव, लोकशाही निर्जीव’, ‘भूखंडाच्या लुटीसाठी आयुक्त-सत्ताधाऱ्यांची मिलीजुली’ असे टीकेचे प्रहार करत भाजप नगरसेवकांनी मंगळवारी मुख्यालय दणाणून सोडले. भाजप नगरसेवकांचे आंदोलन सुरू असताना एरवी आक्रमक भूमिकेत दिसणारे जयस्वाल मंगळवारी मुख्यालयाकडे फिरकलेही नाहीत. भाजपने केलेल्या आरोपांसंबंधी आयुक्तांशी कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.

ठाणे शहरातील मैदानासाठी आरक्षित असलेले भूखंड बिल्डरांना दिले जात असतील तर यापेक्षा मोठे दुदैव नाही. यासंबंधीचा प्रस्ताव खुद्द प्रशासकीय प्रमुखांनी मांडला याचे आश्चर्य वाटते. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे दाद मागू. काहीही झाले तरी ठाण्यातील मैदाने बिल्डरांच्या घशात जाऊ दिली जाणार नाहीत.

– संजय केळकर, आमदार

शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोटय़वधी रुपयांचे विकास प्रस्ताव मंजुरीस येण्यापूर्वी शिवसेना आणि जयस्वाल यांच्यात समेट होतो हा काही योगायोग नाही. ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित असताना सत्ताधाऱ्यांनी घाईघाईत हे प्रस्ताव मंजूर केले. आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही मोडून काढण्याशिवाय आता पर्याय नाही.

– मिलिंद पाटणकर, गटनेते भाजप