भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस; काँग्रेसकडून टीकास्त्र

‘मेरा शहर मेरा सुझाव’ हे अभियान राबवल्यानंतर नागरिकांकडून मिळालेल्या ८५ हजार सूचनांवरून भाजपचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. ‘संकल्पचित्र’ असे नाव या जाहीरनाम्याला देण्यात आले आहे. आयटी पार्क, औद्योगिक वसाहत, महिला सक्षमीकरण भवन अशी आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. काँग्रेसकडून मात्र या जाहीरनाम्यावर कडाडून टीका करण्यात आली आहे. भाजपचा जाहीरनामा म्हणजे निव्वळ भूलथापा असून काँग्रेसने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजपने नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. यासाठी सूचनापेटय़ा तयार करण्यात आल्या होत्या. शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी या पेटय़ा ठेवण्यात येऊन नागरिकांना त्यात सूचना टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते.  भाजपच्या संकेतस्थळावर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सूचना पाठवण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर ८७ हजार १९५ सूचना प्राप्त झाल्याचा दावा भाजपने केला आहे. यातील ५० हजार सूचना सूचनापेटीत, १० हजार सूचना संकेतस्थळावर, २० हजार सूचना दूरध्वनीद्वारे व उर्वरित सूचना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्राप्त झाल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी दिली.

पार्किंग, मीरा-भाईंदर मुंबईला जोडणारा जोडरस्ता, उड्डाणपूल, क्रीडा संकुल, रंगभूमी, शहर स्वच्छता, मजबूत आणि टिकाऊ रस्ते, फेरीवाल्यांच्या समस्या आदींचा या सूचनांमध्ये प्रामुख्याने समावेश होता. यातील काही सूचनांवर अंमलबजावणी आधीच सुरू असल्याने त्या वगळता इतर मुख्य सूचनांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला असल्याचे आमदार नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केले. सत्तेवर आल्यानंतर ७५ दशलक्ष पाणी योजना, जेसल पार्क येथील रेल्वेखालील भुयारी मार्ग, मेट्रो, २०० खाटांचे रुग्णालय, नाटय़गृह, न्यायालय, सीमेंट काँक्रीट रस्ते आदी दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावा भाजपने जाहीरनाम्यात केला आहे.

‘निव्वळ भूलथापा’

भाजपच्या या जाहीरनाम्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. भाजपने आश्वासनांची पूर्ती केल्याचा दावा केलेली अनेक विकासकामे काँग्रेसने मंजूर करवून आणली आहेत. अनेक कामांसाठी माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा निधी वापरण्यात आला आहे. औद्योगिक वसाहत नेमकी कोणत्या जागेवर उभारणार याचे भाजपकडे उत्तर नाही, आंतरराष्ट्रीय क्रीडांगण उभारण्यात येणाऱ्या जागेबाबत मालकी हक्कावरून वाद सुरू आहे. त्यामुळे भाजपने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने म्हणजे निव्वळ भूलथापा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

जाहीरनाम्यात काय आहे?

*  भाजप पुन्हा सत्तेत आली तर महिला स्वावलंबी होण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र भवन निर्माण करून त्यात विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल.

*  तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आयटी पार्क तसेच औद्यागिक वसाहत निर्माण केली जाईल.

*  जुन्या इमारतींना भोगवटा दाखला मिळावा यासाठी त्या नियमित केल्या जातील.

*  विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारची महाविद्यालये निर्माण केली जातील.

*  आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, कला दालन, नायगाव वसई खाडीपूल, फळ आणि भाजी बाजार आदी सुविधा देण्यात येणार आहे.