राज्यात शिवसेना-भाजप युतीच्या सत्तेत भाऊबंदकीचे प्रसंग वेळोवेळी दिसून येत असताना ठाण्यात भरणाऱ्या नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने मात्र ही मतभेद किमान एकाच चव्हाटय़ावर येऊ नयेत याची पुरेपूर काळजी शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. या नाटय़ संमेलनाचे स्वागताध्यक्षपद पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष खासदार राजन विचारे आहेत. त्यामुळे नियोजनाची एकूणच जबाबदारी शिवसेनेच्या विविध नेत्यांकडे आहे. साहजिकच संमेलनाचे उद्घाटन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. अशा प्रकारे संमेलनाच्या पहिल्या अंकावर शिवसेनेचा प्रभाव असणार आहे. समारोप मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत रंगणार आहे.
ठाण्यात होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे पडघम वाजू लागले असून १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान दादोजी कोंडदेव क्रीडांगणात मुख्य संमेलनाचा उद्घाटन आणि समारोप सोहळा होणार आहे. या दोन्ही सोहळ्यांवर शिवसेना व भाजप या पक्षांचे वर्चस्व लक्षात घेता दोन्ही पक्षांनी नाटय़ संमेलन वाटून घेतल्याची चर्चा सध्या ठाण्यात रंगली आहे. कल्याण-डोंबिवली निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान केलेल्या चिखलफेकीमुळे दोन्ही पक्षांमधून विस्तव जात नाही.
त्यामुळे नाटय़ संमेलनाच्या एकूण आयोजनामध्ये या शहरांमधील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला झोकून दिल्याचे चित्र आहे. या सोहळ्याच्या शुभारंभावर शिवसेनेची छाप उमटेल असा या पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे शुभारंभ सोहळा उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच व्हावा या शिवसेनेच्या आग्रहाला नाटय़ परिषदेनेही हिरवा कंदील दाखविला असून या सोहळ्याला भाजपचा एकही वरिष्ठ नेता अथवा मंत्री उपस्थित राहणार नाही हे स्पष्ट होऊ लागले आहे. दरम्यान, समारोपप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या लोकप्रतिनिधींची मांदियाळी दिसून येणार आहे.