प्रस्तावित महापालिका निर्णयाबाबत शिवसेना अंधारातच
अंबरनाथ-बदलापूर महानगरपालिकेच्या निर्मितीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असून कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीही स्थापन झाली आहे. या घडामोडी अत्यंत वेगाने घडत असून राज्यातील सत्ताधारी भाजप यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. पनवेल नगरपालिकेच्या बरोबरीनेच अंबरनाथ-बदलापूरची महापालिका करत पक्षवाढीसाठी व सत्तेसाठी आणखीन एक संधी साधण्याचा राज्य पातळीवरील भाजप नेत्यांचा होरा असल्याचे बोलले जात आहे.
स्मार्ट सिटीचे व विकासाचे स्वप्न दाखवून महापालिका काबीज करत पक्षवाढ करावी हा देखील यामागील हेतू असल्याचे समोर येत आहे. यात, या पालिका क्षेत्रात ताकद असलेल्या शिवसेनेला गृहीतही न धरता अंधारात ठेऊन ही प्रक्रिया राबवली जात असल्याचेही काही जाणकारांनी मत नोंदवले आहे.
अंबरनाथ व बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणूका यंदाच्या एप्रिल महिन्यात पार पडल्या. दोन्ही पालिका निवडणुकीत आपला बालेकिल्ला राखत शिवसेनेने बहुमताच्या बळावर सत्ता काबीज केली. मात्र, यावेळी लोकसभा निवडणूकीवेळी भाजपच्या वाढलेल्या प्रभावानंतर बदलापूरात पालिका निवडणुकीवेळी नगरसेवकांची संख्या ७ वरून २० झाली तर, अंबरनाथमध्ये हीच संख्या २ वरून १० झाली. यावेळी, बदलापूरात स्वत मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावत बदलापूरच्या पुढील विकासावर माझे लक्ष राहील असे सुतोवाच केले होते. ेत्यांच्या मनात सध्या वेगळेच काही शिजत असल्याचे दिसून येत आहे.
कडोंमपाच्या निवडणुकीचेवेळी झालेली भाजपची परिस्थिती याहीवेळी होण्याची शक्यता असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, असले धाडसी प्रयोग करताना भाजपने सावधानतेने पावले उचलावीत अन्यथा तोंडावर पडण्याची शक्यता जास्त असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.
..तर सत्तांतराची शक्यता
बदलापूरात अवघ्या काही जागांच्या फरकाने भाजपची सत्ता गेली. त्यामुळे या ठिकाणी विकासाची स्मार्ट स्वप्ने दाखवत महापालिका केल्यास येथे सत्तांतर होऊ शकते असा कयास भाजपच्या राज्यातील शिर्षस्थ नेत्यांनी बांधला असल्याची शंका येत आहे. त्यातच अंबरनाथ-बदलापूरमध्ये महापालिका निर्मितीच्या सध्या चालू असलेल्या गडबडीत शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांचे अस्तित्व दिसून येत नसल्याने याहीवेळेस शिवसेनेला अंधारात ठेऊनच आपले घोडे दामटणार असल्याचे दिसत आहे.