शिवसेनेला ५० टक्के जागांचा ‘गुगली’ टाकणार?; युतीसाठी उभय पक्षांमध्ये थेट चर्चेची तयारी

महापालिका निवडणुकीत युतीसाठी शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये थेट चर्चेची तयारी सुरू झाली असताना ठाण्यात मात्र भाजपच्या नेत्यांनी ५० टक्के जागांचा प्रस्ताव शिवसेनेपुढे मांडण्याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या पारडय़ात २३ जागा टाकण्यात आल्या होत्या. तरीही पक्षाची ताकद वाढली आहे, अशी भूमिका घेत शिवसेनेपुढे वाढीव जागांचा प्रस्ताव मांडण्याची रणनीती भाजपचे नेते आखत आहेत. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रदेश समितीकडे पाठविण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी ठाण्यातील नेत्यांना दिल्या.

भाजपच्या ठाण्यातील नेत्यांचा गुरुवारी झालेल्या बैठकीतील सूर आणि शहरात फलकबाजी करत युती नको यासाठी धरलेला आग्रह लक्षात घेता युतीसंबंधीच्या चर्चेत अधिक आक्रमकपणे शिवसेनेला सामोरे जायचे अशी रणनीती भाजपने आखल्याचे दिसून आले. लोकसभा, विधानसभा आणि राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर ठाण्यातील भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातूनच त्यांनी ठाणे महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केली आहे.

एकेकाळी ठाणे जिल्ह्य़ाचे प्रतिनिधित्व रामभाऊ म्हाळगी, राम कापसे आणि जग्ननाथ पाटील या नेत्यांनी केले असून त्या काळात ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.

या नेत्यांनंतर जिल्ह्य़ात शिवसेनेची ताकद वाढली आणि भाजपचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात गेला. गेली अनेक वर्षे शिवसेना-भाजप युतीची महापालिकेत सत्ता असली तरी युतीमुळे मात्र भाजपची ताकद वाढू शकलेली नाही, अशी सल भाजपच्या ठाण्यातील नेते आणि अनेक कार्यकर्त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून आहे.

स्थानिक नेत्यांचा एकंदर सूर लक्षात घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शिवसेनेसोबत युती करायची की नाही, यासंबंधीचा प्रस्ताव खासदार कपील पाटील यांनी राज्य समितीपुढे ठेवावा, अशा सूचना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याच्या निर्णयाचा चेंडू प्रदेश समितीने आता स्थानिक नेत्यांकडे ढकलल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक नेते युतीबाबत काय प्रस्ताव पाठविणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेसोबत चर्चा सुरू होताच ५० टक्के जागांचा प्रस्ताव मांडण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकीत शहरातील महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजपला मताधिक्य असून जागावाटप करताना हा निकष लावावा, असा आग्रह धरला जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.

आम्ही केवळ तहात पराभूत

गुरुवारी झालेल्या मेळाव्यात भाजपचे ठाणे विभाग अध्यक्ष खासदार कपील पाटील यांनी, ‘आपली ताकद कधीच कमी नव्हती, आम्ही केवळ तहात पराभूत व्हायचो’, असा सूर लावला. इतिहासाची पुनरावृत्ती करायची संधी आम्हाला द्या, अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली. पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनीही ठाण्यात भाजपला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याची संधी यावेळी आम्हाला द्या, अशी मागणी केली.

एकच संधी द्या

ठाण्यातही भाजप क्रमांक एकचा पक्ष व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आमचे हात मोकळे करा आणि आम्हाला एकच संधी द्या, मग बघा पुण्याप्रमाणेच ठाणे तिथे काय उणे असे आम्ही करून दाखवतो, असे सांगत ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.