गतवेळच्या तुलनेत दुपटीहून अधिक जागांवर विजय, युती नाकारल्याचा सेनेला फटका?

विद्यमान महापालिकेत महापौरपदी विराजमान असलेल्या शिवसेनेला मागे टाकत भाजपने भिवंडीत मोठी मजल मारली आहे. भाजपशी युती न करता स्वबळावर सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या शिवसेनेला निवडणुकीत अवघ्या १२ जागी विजय मिळवता आला. पक्षाचे संख्याबळ गतवेळच्या तुलनेत १० ने घटले असताना भाजपने मात्र १९ जागा जिंकत सेनेवर मात केली.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भिवंडी महापालिका हद्दीत शिवसेना आणि भाजप असा थेट सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी शहर, शहापूर, कल्याण ग्रामीण, विक्रमगड अशा पट्टय़ात शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी पक्षाचे नेते आग्रही होते. मात्र, राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले कपिल पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करत भाजपने युतीच्या जागावाटपात शिवसेनेवर आघाडी मिळवली. मागील अडीच वर्षांत भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी अत्यंत आक्रमकपणे या भागात भाजपचे संघटन वाढविण्यास सुरुवात केली असून शिवसेनेला जागोजागी धक्के दिले जात आहेत. भिवंडी महापालिका हद्दीत शिवसेनेची भाजपपेक्षा चांगली ताकद असल्याचे चित्र होते. या भागात मुस्लीम मतदार काँग्रेस, समाजवादी पक्षात विभागला जात असल्याने येथील आगरी आणि हिंदूबहुल वस्त्यांमधून शिवसेनेने आक्रमकपणे संघटना वाढवली होती. दहा वर्षांपूर्वी योगेश पाटील यांनी आणि नंतरच्या काळात रुपेश म्हात्रे यांच्या रूपाने शिवसेनेने येथून विधानसभेच्या तीन निवडणुकाजिंकल्या. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भिवंडी पश्चिमेत भाजपचे महेश चौघुले यांनी विजय मिळवला. मात्र, पूर्वेतील शिवसेनेचा गड भाजपला भेदता आला नव्हता. यावेळच्या महापालिका निवडणुकीत मात्र पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपने शिवसेनेला लोळविल्याचे चित्र दिसून आले.

भिवंडी निवडणुकीत मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये सपा आणि राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नव्हता. त्याचाच फायदा काँग्रेसला झाला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फायदा काँग्रेसला झाला असे म्हणता येणार नाही.

– कपिल पाटील, खासदार, भाजप

देशात आणि राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही दोन्ही पक्ष भिवंडीत मात्र स्वबळावर निवडणूक लढवितात, असा प्रचार काँग्रेसकडून केला गेला. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला आहे. युती होऊ नये अशी इच्छा भाजप नेत्यांची होती. त्यामुळे यासंबंधीचा दोष शिवसेनेच्या माथ्यावर मारून चालणार नाही.

– रुपेश म्हात्रे, आमदार, शिवसेना