डोंबिवली दुर्घटनेनंतर परिसरातील इमारतींचे परीक्षण करण्याचा विचार; परिसरातील घरांमधील नुकसानीचा आकडा लाखांच्या घरात

डोंबिवली एमआयडीसीमधील प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाचे दूरगामी परिणाम परिसरातील इमारतींवर दिसण्याची भीती व्यक्त होत आहे. या स्फोटामुळे एमआयडीसी परिसरातील चार किमी परिसरातील इमारतींमधील घरे, दुकाने तसेच औद्योगिक कंपन्यांना हादरा बसून तेथील खिडक्या, फर्निचर यांना नुकसान पोहोचले. या नुकसानीचा सविस्तर पंचनामा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले असून सुमारे एक हजारांहून अधिक घरांमधील वस्तूंचे तसेच बांधकामाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आकडा पुढे येत आहे. त्याच वेळी स्फोटाच्या हादऱ्यामुळे परिसरातील इमारतींच्या पायालाही धक्का बसल्याची भाती व्यक्त होत असून खबरदारी म्हणून या इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याचा विचार पालिका प्रशासनाने सुरू केला आहे. काही गृहसंकुलांमधील रहिवाशांनी इमारतीच्या बांधकामाची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी स्वत: संरचनात्मक परीक्षण करण्याची तयारीही सुरू केली आहे.

डोंबिवलीतील औद्योगिक विभागातील कंपनीत झालेल्या स्फोटाचे हादरे दोन ते तीन किमी परिसरातील इमारती व दुकानांना जाणवले. या हादऱ्यांमुळे अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, जवळच्या घरांच्या फर्निचरचेही नुकसान झाले, अनेक दुकानांचे शटर तुटले, रस्त्यावरील गाडय़ांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी या कामासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार शुक्रवारी सायंकाळपर्यंत ८९३ निवासी तर ७ औद्योगिक कंपन्यांमध्ये नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. ‘हे काम अद्याप सुरू असून आणखी एक दिवस यात जाईल. किती नुकसान झाले आहे हे अद्याप सांगणे शक्य होणार नाही. लाखोंच्या घरात हा आकडा जाईल,’ असे नायब तहसीलदार उद्धव कदम यांनी सांगितले.

चोरीची अफवांमुळेही घबराट

अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा, दुकानांचे शटर तुटल्याचा फायदा घेऊन चोरटय़ांनी हात साफ केल्याची अफवा शुक्रवारी डोंबिवलीत होती. मात्र, अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचे मानपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर ढिकले यांनी सांगितले.