डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरात गुरुवारी झालेला भीषण स्फोट हा बॉयलरमुळे नव्हे तर केमिकल रिअॅक्टरमुळे झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी ही माहिती दिली. अपघातानंतर या परिसराची पाहणी करताना कुठेही बॉयलरचे अवशेष आढळून आले नाहीत. मात्र, यावेळी दोन केमिकल रिअॅक्टर्स मिळाल्याचे गुंड यांनी सांगितले. त्यामुळे हा स्फोट या रिअॅक्टर्समुळेच झाला असावा, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रसायनांवर उच्च तापमानावर प्रक्रिया करण्यासाठी या रिअॅक्टर्सचा वापर केला जातो. मात्र, यामध्ये काही बिघाड झाल्यास अपघात घडण्याची शक्यता असते. असाच प्रकार प्रोबेस कंपनीत घडल्याची शक्यता गुंड यांनी व्यक्त केली. दरम्यान, या स्फोटातील मृतांची संख्या शनिवारी १२ वर जाऊन पोहोचली. आज सकाळी स्थानिक नागरिकांना येथे एक अनोळखी मृतेदह आढळून आला आहे.
डोंबिवली अद्याप सुन्न.. 
स्फोटात जमीनदोस्त झालेल्या प्रोबेस एन्टप्रायसेस कंपनीच्या आवारातील ढिगारे उपसण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातर्फे सुरू आहे. वायुगळतीचा धोका असल्याने अतिशय काळजीपूर्वक हे काम सुरू आहे. प्रोबेसचे डॉ. विश्वास वाकटकर यांची दोन्ही उच्चशिक्षित मुले नंदन (३२) व सुमीत (३०) आणि सून स्नेहल (२८) यांचाही मृत्यू या स्फोटात झाल्याने त्यांच्याही कुटुंबियांना या आघातातून सावरणे कठीण झाले आहे. या स्फोटावरून प्रोबेसच्या व्यवस्थापनावर शुक्रवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
हादऱ्याने इमारतींच्या संरचनेलाही धक्का?