कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रचारसूत्राची पुनरावृत्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचाराचा शेवट ठाण्यातील संवाद मेळाव्याने करणार आहेत. पाचपाखाडी येथील सरस्वती शाळेच्या सभागृहात रविवारी दुपारी तीन वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यानिमित्त भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शहरात जोरदार वातावरणनिर्मिती केली आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. मुंबई, ठाण्यासह राज्यभर प्रचारसभांचा धडाका सुरू असताना रविवारी ठाण्यात अगदी अखेरच्या काही तासांत मुख्यमंत्री कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही भाजपने अगदी शेवटच्या क्षणी मुख्यमंत्र्यांना डोंबिवलीत पाचारण करून सर्वानाच धक्का दिला होता. कल्याणात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल असे एकंदर वातावरण असताना मुख्यमंत्र्यांनी प्रचार संपण्यास तासभर शिल्लक असताना कार्यकर्त्यांना संबोधित करताना अत्यंत आक्रमक भाषण केले.

वाघाच्या जबडय़ात हात घालून दात मोजण्याची भाषा करीत शिवसेनेविरोधात मुख्यमंत्र्यांनी तोफ डागल्याने त्याचे सकारात्मक परिणाम निवडणूक निकालांवर दिसून आले. कल्याणातील हा अनुभव ताजा असल्याने नेमकी अशीच रणनीती भाजपने ठाण्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून रविवारी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलेल्या संवाद सभेच्या निमित्ताने पाचपाखाडी भागात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी पक्षाकडून केली जात आहे.

  • न्यायालयाच्या एका आदेशानुसार सेंट्रल मैदानावर यंदा एकाही जाहीर सभेस परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ठाण्यातील सभेसाठी शहराच्या एका कोपऱ्यात उपवनलगत असलेल्या मैदानात सभा घ्यावी लागली होती.
  • शिवसेनेने मात्र मूळ शहराच्या अगदी मध्यभागी मासुंदा तलावालगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेत वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला.
  • उद्धव यांच्या सभेसाठी मैदान मिळत नसताना शिवसेनेने मासुंदा तलावालगत असलेला रस्त्याचा एक भाग या सभेसाठी निवडणूक प्रशासनाकडून आग्रहाने मागून घेतला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमासाठी भाजपनेही मूळ शहराची निवड केली आहे.