विहिगावला मध्य वैतरणातून पाणी पुरवठा; पावसाळ्यानंतरची ग्रामस्थांची वणवण थांबणार

मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे असूनही पावसाळ्यानंतर पाणी टंचाई सहन कराव्या लागणाऱ्या शहापूरमधील विहि गावाला आता मुंबई महापालिका पाणी पुरवठा करणार आहे. गावालगत असणाऱ्या मध्य वैतरणा धरणातून जिल्हा परिषदेमार्फत योजना राबवून गावाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी संसद आदर्श गाव योजनेअंतर्गत विहि गाव दत्तक घेतले आहे. त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे सुमारे १७०० लोकवस्तीच्या या गावाची आता पावसाळ्यानंतर पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. मात्र याच न्यायाने वर्षांनुवर्षे पाणी टंचाई भेडसाविणाऱ्या परिसरातील इतर गावांनाही ’मुंबई’ महापालिकेने पाणी पुरवठा करावा, असा आवाहन या भागातील ग्रामस्थ करीत आहेत.

भौगोलिक कारणांमुळे भरपूर पाऊस पडूनही शहापूरमधील शेकडो गावांना जानेवारी महिन्यानंतर थोडय़ा फार फरकाने पाणी टंचाई भेडसावू लागते. एप्रिल ते जून या तिमाहीत तर गावातील महिला हंडाभर पाण्यासाठी कित्येक किलोमिटर वणवण करताना दिसतात. याच तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा ही मोठी धरणे आहेत. इथून दररोज कोटय़वधी लिटर्स पाणी मुंबईला वाहून आणले जाते. त्या तुलनेत स्थानिक गावांची पाण्याची गरज अतिशय नगण्य आहे. त्यामुळे लगतच्या धरणांमधून परिसरातील टंचाईग्रस्त गावांना योजना राबवून पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक करीत आहेत. खासदारांनी पाठपुरावा केल्याने विहि गावाचा पाणी प्रश्न सुटणार आहे. याच न्यायाने शहापूरमधील धरणांलगतच्या अन्य गावांचाही प्रश्न सुटू शकेल.

रोज एक लाख लिटर

शहापूरपासून ४३ किलोमिटर अंतरावर असलेल्या विहि गावाची लोकसंख्या १ हजार ७७२ असून त्यासाठी मध्य वैतरणा धरणातून दरवर्षी ३६. ५० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा करण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार दरदिवशी विहिकरांना एक लाख लिटर्स पाणी मिळू शकेल. डोंबिवली येथील विवेकानंद सेवा मंडळ गेल्या दोन दशकांहून अधिक काळ विहि गावात शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवीत आहे.