नगरसेवकाचा आरोप
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे प्रभाग अधिकारी, काही बोगस तथाकथित पत्रकारांच्या साटय़ालोटय़ांच्या व्यवहारामुळे तोडण्यात येत नाहीत, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे नगरसेवक श्रेयस समेळ यांनी शनिवारच्या सर्वसाधारण सभेत केल्याने खळबळ उडाली आहे. त्या पत्रकारांची नावे जाहीर करा अशी जोरदार मागणी पत्रकारांच्या एका गटाने केली आहे.
नगरसेवक समेळ यांच्या प्रभागात काही मंडळींनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. ती बांधकामे तोडावीत म्हणून प्रभाग अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली आहेत. या तक्रारींना दाद देत नसल्याने समेळ यांनी सर्वसाधारण सभेत अनधिकृत बांधकामांचे प्रभाग अधिकाऱ्यांकडून पाठराखण केले जात असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी ठराविक प्रभाग अधिकारी आणि काही बोगस पत्रकारांचे साटेलोटे आहे. यामुळे बेकायदा बांधकामे पाडली जात नाहीत असा आरोप त्यांनी केला. आपल्या व्यवसायाला आणि बंधूंना बदनाम केले जात आहे म्हणून उपस्थित पत्रकारांचा तीळपापड झाल्याने तातडीने त्या पत्रकारांची नावे जाहीर करण्याची मागणी केली. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

पत्रकाराला मारहाण
एका मराठी वाहिनीचे पत्रकार अजय दुधाने यांना रविवारी रात्री विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुभाष पानसरे यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याने खळबळ उडाली आहे. दुधाने हे एका आगीसंदर्भातचे वार्तांकन करण्यासाठी विठ्ठलवाडीत गेले होते. ते आगीचे छायाचित्रण करीत असताना पाठीमागून आलेल्या पानसरे यांनी दुधाने यांच्या पाठीवर जोरदार रट्टा मारला. तसेच शिवीगाळ सुरु केली. या प्रकारामुळे दुधाने चक्रावून गेले. या प्रकरणाची पत्रकार संघटनांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार यांची भेट घेऊन पानसरे यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली.