डोंबिवलीतील रहिवाशाला एजंटकडून गंडा

दिवाळीनिमित्त सुट्टीच्या हंगामात प्रत्येकाला आपल्या गावी, प्रांतात जाण्याची लगबग असते. या निमित्ताने रेल्वे प्रवासाची तिकिटे रेल्वे स्थानकातील रेल्वे बुकिंग काऊंटरला तासन् तास उभे राहून काढण्याऐवजी अनेक जण खासगी रेल्वे तिकीट एजंट किंवा झटपट सेवा देणाऱ्या ‘जस्ट डायल’ खासगी सेवेचा लाभ घेतात. मात्र, आता ‘जस्ट डायल’ सेवेवर किती विश्वास ठेवायचा याचा प्रत्येक प्रवाशाने विचार करण्याची वेळ आली आहे. कारण या ‘जस्ट डायल’ सेवेच्या एका खासगी तिकीट एजंटकडून डोंबिवलीतील एका रहिवाशाने गुजरातला जाण्यासाठी काढलेली रेल्वे तिकिटे चक्क बोगस निघाली आहेत.

फसवणुकीचा प्रत्यक्ष अनुभव

डोंबिवली पूर्वेतील गोळवली येथे राहणारे हरीष भानुशाली यांना आपल्या कुटुंबीयांसह गुजरातमधील भूज येथे जायचे होते. गेल्या आठवडय़ात त्यांचा दौरा होता. रेल्वे स्थानकात जाऊन तेथे रांगेत वेळ घालविण्यापेक्षा आपण ‘जस्ट डायल’ खासगी सेवेचा लाभ घेऊ, असा विचार हरीश यांनी केला. त्यांनी ‘जस्ट डायल’ सेवेवर संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने ती तात्काळ उपलब्ध करून दिली. ‘जस्ट डायल’ सेवेशी बोलणे झाल्यानंतर, हरीश यांना पाच मिनिटांत एक भ्रमणध्वनी आला. सलीम नावाच्या त्या व्यक्तीने  आपणास रेल्वे तिकीट बुकिंग करून पाहिजे ना’, अशी विचारणा केली. जस्ट डायलच्या माध्यमातून विचारणा झाल्याने, सलीम हा रेल्वेचा अधिकृत एजंट असावा असा विचार करून, हरीश यांनी भूज स्थानकापर्यंतची कच्छ एक्स्प्रेसची तीन वातानुकूलित तिकिटे काढली.

सलीमने हरीश यांना तात्काळ ‘फेझ.शेख अ‍ॅट द रेट जीमेल.डॉटकॉम’ या ई-मेलवर प्रवास करणाऱ्या कुटुंबीयांची नावे, वय, पॅनकार्ड, छायाचित्रांसह माहिती मागवली. हरीश यांनी तात्काळ तिकिटे मिळतात म्हणून ती माहिती पाठवली. संध्याकाळी आपणास ठाणे रेल्वे स्थानकाजवळ तिकिटे भेटतील, असे सांगण्यात आले. तिकीट भाडे ४ हजार ४६३ रुपये झाले आहे. ‘आयआरसीटीसी’चा आकार २३ रुपये यांसह एकूण आपण ८ हजार २९६ रुपये मला द्यावेत, असे सलीमने हरीश यांना सांगितले. सलीमने हरीशना त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवरून तिकिटे काढल्याची छायाचित्रे पाठवली. संध्याकाळी सलीम रेल्वे स्थानकाजवळ आला. त्याने रेल्वेचे ‘आयआरसीटीसी’चा शिक्का असलेली तिकिटे, सोबत गुप्ता टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स (विलेपार्ले), शॉप क्र. ३, इस्कॉन मंदिराजवळ, जुहू बीच, विलेपार्ले (पश्चिम). ९६९९९३९९३७ अशी पावती दिली. तिकीट नोंदणी व प्रवास खात्रीकरणासाठी (पीएनआर) हरीश यांनी प्रवासाच्या आदल्या दिवशी रात्री स्वत:च्या भ्रमणध्वनीवरून तो तपासण्याचा प्रयत्न केला. तो बैठक क्रमांक यादीत नसल्याने सलीमने हरीशनी संपर्क केला. तेव्हा आणखी अर्धा तासाने संपर्क करा. त्यानंतर सलीमचा भ्रमणध्वनी कायमचा बंद झाल्याचे हरीश यांनी सांगितले.

पोलिसांची शक्यता

* जस्ट डायल सेवेवर येणारे भ्रमणध्वनी क्रमांक हॅक करून ते खासगी बोगस एजंट मिळवत असावेत.

* जस्ट डायल सेवेतील कर्मचारी येणारे भ्रमणध्वनी बोगस एजंटांच्या स्वाधीन करीत असावेत.

* ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले तर त्यात सलीम आढळून येईल.

रेल्वेची आरक्षित तिकीट बुकिंगची स्वतंत्र व्यवस्था आहे. ‘जस्ट डायल’ सेवेशी रेल्वेचा कोणताही संबंध नाही. अशी कोणा प्रवाशाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी प्रथम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. त्या निमित्ताने खरे ते वास्तव पुढे येईल. आरक्षित तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत बुकिंग सेवेचा लाभ घ्यावा.

-नरेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.