सावरकरांचे राष्ट्रप्रेमी, विज्ञाननिष्ठ आणि द्रष्टे विचार आपल्या देशातील आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी क्षितिज ग्रुपतर्फे ‘सावरकर स्मरण’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या आत्मार्पण दिनानिमित्त अष्टविनायक चौक येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या दोन दिवसीय प्रदर्शनात सावरकरांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला होता. स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त आणि ज्येष्ठ लेखक दुर्गेश परुळेकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रदर्शनात सावरकरांची शंभर छायाचित्रे, १० ते १५ निवडक लेख, काही निवडक कविता तसेच काही राष्ट्रभक्तीपर वाक्येही मांडण्यात आली होती. मराठी भाषा शुद्धी म्हणजेच मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या उर्दू व इंग्रजी शब्दांना दिलेले मराठी प्रतिशब्द प्रचलित करण्याचे कार्य सावरकरांनी केले. त्यातील सुमारे ४०० शब्दांची यादी या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. नुकत्याच अंदमानातील सावरकरांच्या चिकटवहीत आढळलेल्या उर्दू देशभक्तिपर गझलांचे हस्तलिखित या प्रदर्शनाचे आकर्षण ठरले होते.

सावरकरलिखित व त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तकेही प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवली होती.