गेला आठवडाभर ठाणे परिसरात काहीसे उत्सवी वातावरण होते. कळव्यासारख्या शहराबाहेरच्या उपनगरात ठाणे कलामहोत्सव भरवण्यात आला होता. त्याच वेळी अंबरनाथ येथे शिवमंदिर महोत्सव पार पडला. या दोन्ही महोत्सवांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण या दोन महोत्सवांना झालेल्या भाऊगर्दीत मुख्य शहरात, ठाण्यात आयोजित करण्यात आलेला एक उत्सव पुरता हरवून गेला. तो म्हणजे तलावपाळीवर भरवण्यात आलेला ग्रंथोत्सव. ठाण्याबाहेरची सोडाच, पण ठाणे शहरातील माणसंही या उत्सवाकडे फारशी वळली नाहीत आणि या महोत्सवाची पाने कोणत्याही रोमांचाविनाच मिटली गेली.
ठाण्यात सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल नेहमीच राहते. नाटकांनाही चांगला प्रतिसाद नेहमीच राहतो. गतवर्षी झालेल्या उपवन महोत्सवाने तर विक्रमी गर्दी खेचली. त्यानंतर या वर्षीपासून कळवा येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे, तर अंबरनाथ खासदार श्रीकांत िशदे यांच्यातर्फे कलामहोत्सव भरविण्यात आले होते. यामध्ये नामवंत चित्रकारांची चित्रे, विविध कला, वेगवेगळया उद्योजकांचे स्टॉल आणि पद्मश्री हरिहरन, पंडित जसराज यांच्यासारख्या दिग्गजांची उपस्थिती व कार्यक्रमांची रेलचेल यामुळे हे महोत्सव सर्वाच्याच पसंतीस उतरले. सुबक मांडणी आणि निवडक कलाकृती पाहण्यासाठी दर्दीनी चांगलीच गर्दी केली होती. मात्र हे महोत्सव एकाच वेळी सुरू झाल्यामुळे अनेकांना दोन्हीपकी एकाच महोत्सवात सहभागी होता आले. त्यामुळे काही कार्यक्रमांमध्ये इच्छा असतानाही काही जणांना सहभागी होता आले नाही.
त्याच वेळी ठाण्याच्या शिवाजी मदानामध्ये शासनातर्फे ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला होता. या ग्रंथ उत्सवाची मांडणी आणि सहभागी झालेले प्रकाशक, पुस्तके हे सर्वच दर्जेदार होते.
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ आणि नॅशनल बुक ट्रस्टसारखी अन्यत्र न उपलब्ध होणारी पुस्तकेही या वेळी उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू, अशोक बागवे, महेश केळूसकर, अशोक नायगावकर, संभाजी भगत आणि अरुण म्हात्रे यांचा सहभाग असलेले कविसंमेलन, मुलाखती, चर्चा, परिसंवाद असे कार्यक्रमही या उत्सवात आयोजित करण्यात आले होते. स्थानिक लेखक, कवी आणि पत्रकारांचाही यात सहभाग होता. मात्र, या सगळय़ाकडे ठाणेकरांनी पाठ फिरवली. हाका मारून मारून पुस्तके थकून गेली, पण ठाणेकरांची वाचनभूक चाळवलीच गेली नाही.
खरंतर ठाण्यात असं सहसा कधी होत नाही. पुस्तके आणि गं्रथांच्या प्रदर्शनाला, साहित्यिक कार्यक्रमांना येथे चांगला प्रतिसाद मिळतो. पण यंदा साऱ्यांचे लक्ष दुसऱ्याच महोत्सवांकडे लागले होते. शासनानेदेखील या उत्सवाची जाहिरात केली नाही आणि माध्यमांनीही त्याची हवी तेवढी दखल घेतली नाही. अन्य दोन महोत्सवांच्या धुरिणांनी आपले राजकीय, आर्थिक वजन वापरून आपले कार्यक्रम यशस्वी करून दाखवले. पण पुस्तकांना तसा आवाज, साथ मिळालीच नाही.
खरंतर ठाण्यात दर आठवडय़ाला असे महोत्सव जरी घेतले तरी त्याला प्रतिसाद मिळेल असे चांगले वातावरण आहे; मात्र आता ठाणे घोडबंदरपासून कळवा आणि पुढे बदलापूपर्यंत पसरले आहे. त्यामुळे खरे आव्हान आहे ते अशा विखुरलेल्या आणि मूळ ठाण्यापासून हळूहळू हद्दपार होणाऱ्या रसिकापर्यंत पोहोचण्याचे. त्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून कलेच्या व्यासपीठावर समन्वयाचा सेतू बांधला गेला असता तर हा ग्रंथोत्सवही लोकप्रिय ठरला असता. असे ग्रंथोत्सव प्रत्येक जिल्ह्य़ात होत असतात. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. पण सरकारी कार्यक्रमातली सपकता आणि उदासीनता या उत्सवालाही झाकोळून गेली.
ग्रंथोत्सवामध्ये नंदूरबारसारख्या अत्यंत ग्रामीण भागात काम करणाऱ्या रजपूत या माहिती अधिकाऱ्याने एक चांगला प्रयोग करून दाखविला आहे. ग्रंथालयांना वर्षभराची खरेदी करण्यासाठी ग्रंथोत्सवात येण्याचे आवाहन करून विक्रेत्यांकडून सवलती मिळवून देण्याचे काम रजपूत यांनी केले आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे प्रकाशकांचा तरी या उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पण ग्रंथालयांच्या भिंतीभिंतीवर पुस्तकांचेच राज्य असते. अशा ग्रंथोत्सवातून पुस्तके सामान्य वाचकाच्या घरात विराजमान व्हावी, अशी अपेक्षा असते. ती पूर्ण होऊ शकली नाही, ही चुटपुट साहित्यमनाला अजूनही छळते आहे.
प्राची