स्नेहा रायकर, अभिनेत्री

आयुष्यात आईवडील आणि शिक्षकांइतकेच संस्कार करण्यात, व्यक्तिमत्त्व घडविण्यात पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावितात. माझी आणि पुस्तकांची मैत्री शालेय जीवनातच झाली. घरात तसे फारसे वाचनाचे संस्कार नव्हते. शाळेत मात्र खूप चांगली पुस्तके वाचायला मिळाली. त्यामुळे संस्कारक्षम वयात उत्तम अक्षर वाङ्मयाचा परिचय झाला. मुंबईतील परळ येथील शिरोडकर शाळेत माझे शिक्षण झाले. आमच्या शाळेत कोणतीही स्पर्धा झाली की पारितोषिक म्हणून आम्हाला पुस्तके दिली जायची. तीच माझी वाचनाची खरी सुरुवात. अगदी सुरुवातीला पंचतंत्र, इसापनीती, अकबर-बिरबल अशी पुस्तके मी वाचली. आजकाल मेडल्स आणि ट्रॉफी पारितोषिक म्हणून देतात. मला त्यापेक्षा पुस्तके बक्षीस म्हणून अधिक आवडतात. शाळेत असताना गोष्टींची पुस्तके खूप वाचली. त्यात किशोर, चांदोबा या नियतकालिकांचाही समावेश होता.

महाविद्यालयात गेल्यावर मी विज्ञान शाखेत असल्यामुळे मला तसा इतर वाचनासाठी कमी वेळ मिळायचा. मात्र अभ्यासाच्या संदर्भात इतर बरीच पुस्तके मी वाचली. विषयाचा सखोल अभ्यास होण्यासाठी ते अवांतर वाचन माझ्या उपयोगी पडले. माझा होमसायन्स विषय असल्याने त्यासंदर्भात भरपूर वाचायला मिळाले. त्यात डाएटवर लिहिलेली बरीच पुस्तके होती. काय खावे, काय खाऊ नये, काय खाल्ल्याने काय होते, कुपथ्य म्हणजे काय अशा प्रकारे माझ्या ज्ञानात बरीच भर पडली. लहान मुलांच्या सायकोलॉजीचा अभ्यास, मुलांची वाढ कशी होते या विषयाच्या संदर्भात पुस्तके मी वाचली आहेत. तेव्हा मी हे सारे अभ्यासाचा विषय म्हणून वाचले. मात्र त्याचा पुढील जीवनात मला खूप उपयोग होतोय. वाचनाने व्यक्ती बहुश्रुत होते, हे मी माझ्या अनुभवाने सांगू शकते. बहुतेकांना पु.ल.देशपांडे यांचे लेखन आवडते. मीसुद्धा त्यांच्या लेखनाची फॅन आहे. त्यांचे लेख वाचताना मनात एक प्रकारचे प्रसन्न भाव तरळून जातात. फ्रेश व्हायला होतं. किती वर्षांपूर्वी पु.लं.नी लिहून ठेवलंय, पण त्यातला ताजेपणा अजूनही अगदी तसाच आहे. पु.लं.ची बटाटय़ाची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, शिवाजी सावंत यांचे ‘मृत्युंजय’ ही माझी आवडती पुस्तके आहेत. मी मिळेल त्या विषयाची पुस्तके वाचते. अगदी सामान्य ज्ञानाची माहिती देणारी पुस्तकेही मी आवडीने वाचली आहेत. आपण वाचलेले प्रत्येक पुस्तक आपल्याला एक नवीन अनुभव देत असते. प्रसंगी आपल्याला ते शिकविते. धीर देते.

मध्यंतरीच्या काळात माझे वाचन कमी झाले होते. मात्र आता पुन्हा जोर धरला आहे. सध्या मी इंग्रजी पुस्तके अधिक वाचते. सध्या मी ‘नॉट विदाआउट माय डॉटर’ हे पुस्तक वाचते आहे. ती एक अतिशय उत्कंठावर्धक सत्यकथा आहे. हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवते, यात शंका नाही. आता रोजची धावपळ वाढली आहे. वाचायला फारसा वेळ मिळत नाही. सलग वाचन शक्य नसलं तरी दिवसभरात वेळ मिळाला की मी पुस्तक उघडून वाचू लागते. आम्ही एकमेकांना चांगली पुस्तके शेअर करतो. हल्ली फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या सोशल मीडियांतूनही बरेच लोक लिहू लागले आहेत. त्यामुळे सहज जाता-येता वाचन होते.

माझ्या घरात नवऱ्याने पुस्तक आणले तर मी ते पहिले वाचते, शोभा डे यांचे ‘स्पीड पोस्ट’, माधव वझे यांचे ‘रंगमुद्रा’, विश्वास पाटील यांचे ‘झाडाझडती’ अशी अनेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. माझ्या आठवणीतील काही ठळक पुस्तकांमध्ये ‘अँड देन वन डे’ या नसिरुद्दीन शहांच्या आत्मचरित्राचा समावेश आहे. पुस्तकांबरोबरच मी मासिकेही नियमितपणे वाचते. ‘फिल्मफेअर’ मी प्रामुख्याने वाचते. कारण त्यामुळे इंडस्ट्रीत काय सुरूआहे, फॅशन ट्रेंड काय आहे, याची माहिती मिळते. माझ्याकडे स्वयंपाकाच्या पुस्तकांचाही संच आहे. आपण तर वाचत आहोतच, पण आता ती सवय पुढच्या पिढीलाही लावायला हवी, असे मला वाटते.

संकलन – सौरभ आंबवणे