विजय पाटील, साहाय्यक आयुक्त, मीरा-भाईंदर

विजय पाटील हे मीरा-भाईंदर महानगरपालिकेतून साहाय्यक आयुक्त म्हणून नुकतेच निवृत्त झाले. प्रशासकीय कामाचा गाडा ओढण्याची ऊर्जा वाचनातून मिळाली असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.

वाचनाची माझी पहिली सुरुवात वृत्तपत्रापासून झाली. वृत्तपत्राचे सखोल वाचन करणे हा माझा पहिल्यापासूनचा व्यासंग. यातूनच मग पुस्तकांच्या वाचनाकडे आपोआप वळलो. आघाडीच्या दैनिकांमध्ये नेहमी पुस्तकांचे परीक्षण लिहून येत असे. लेखकांची नवीन आलेली पुस्तके, त्यात हाताळण्यात आलेले विषय याविषयी विवेचन केलेले असायचे. ते वाचून मग पुस्तके विकत आणण्याकडे माझा कल वाढू लागला. बाजारात नवे पुस्तक आले की ते मी लगेचच खरेदी करत असे. एका अग्रगण्य दैनिकात अशीच ४० पुस्तकांची यादी प्रसिद्ध झाली होती. ही सगळी पुस्तके मी एकदमच विकत आणली.

माझ्या लहानपणी केवळ रेल्वे फलाटांवरील वृत्तपत्रांच्या स्टॉलवरच पुस्तके मिळायची. लहान मुलांसाठी लिहिलेली रंगीबेरंगी चित्रांची पुस्तके त्या वेळी खरेदी करून वाचण्यात एक वेगळाच आनंद मिळायचा.मीरा-भाईंदर महानगरपालिकेतून नुकताच साहाय्यक आयुक्त म्हणून निवृत्त झालो. ग्रामपंचायत काळापासून ते महापालिकेपर्यंत ३६ वर्षे प्रशासकीय काम केले. अनेक वेळा तणावाचे, मन:शांती बिघडवणारे प्रसंग आयुष्यात आले. अशा प्रसंगात पुस्तकाच्या वाचनानेच तारून नेले. या वाचनाने मनातील नैराश्य तर दूर व्हायचेच शिवाय पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची उमेदही मिळायची.

ठरावीक पद्धतीचे वाचन मी कधीच केले नाही. जे पुस्तक चांगले वाटले ते वाचत गेलो. यात सुमती देवस्थळी यांनी लिहिलेली डॉ. अल्वर्ट श्वायझर आणि रशियन तत्त्ववेत्ता लिओ टॉलस्टॉय यांच्यावरील पुस्तके विशेष भावली. विजया मेहता यांचे झिम्मा, प्रकाश आमटे लिखित प्रकाशवाटा तसेच अक्करमाशी, उचल्या ही पुस्तकेदेखील विचार करण्यासाठी प्रवृत्त करून गेले. लोकसत्तामध्ये संपादकीय पानावर प्रसिद्ध होणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचे अर्थशास्त्राशी संबंधित लेख तसेच व्यक्तिवेध ही सदरे अगदी आतुरतेने वाचत असतो.

नगर परिषद असताना शहरातील पहिले सार्वजनिक वाचनालय सुरू झाले आणि योगायोगाने त्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. पुस्तकांची निवड, त्यांची खरेदी, त्यांची नोंद ही कामे आवडीने केली. दीड वर्षांचा हा काळ मी अक्षरश: पुस्तकांच्या विश्वात रमलो होतो. या वेळी केलेल्या वाचनाने जगाची एक वेगळीच ओळख प्राप्त झाली. नोकरीत असताना रात्री जेवल्यानंतर तसेच सुट्टीच्या दिवशीच वाचनासाठी वेळ मिळत असे आता निवृत्तीनंतर वाचनासाठी भरपूर वेळ मिळत आहे. वाचनातून विचार समृद्ध होतात. ते व्यक्त करण्याची कलाही अंगी येते असे म्हणतात. त्यामुळेच आता माझ्या ३६ वर्षांच्या प्रशासकीय कामातील अनुभवांना शब्दबद्ध करण्याचा विचार मनात घोळत आहे. लवकरच तो कागदावरही उतरविण्याचा प्रयत्न सुरू करणार आहे.