वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहतूक सुरळीत

डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागास जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलावर सोमवारी सायंकाळी बोअरिंगची अवजड गाडी बंद पडली. चालकाने हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही गाडी सुरू झाली नाही. पुलाजवळील वाहतूक सेवकाने हा संदेश वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत नगराळे यांना दिला. ही माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्ते, चौकात असलेले वाहतूक पोलिसांचा ताफा कोपर उड्डाणपूल भागात वळविला. त्यानंतर तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे अवजड वाहन पुलावरून बाजूला सारण्यात पोलिसांना यश आले. या काळात पोलिसांच्या सतर्कतेमुळे फारशी वाहतूक कोंडी झाली नाही. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत नवी मुंबई, पनवेल, कल्याण, मुंबई भागातून येऊन डोंबिवली पश्चिमेत जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. पश्चिमेतून पूर्व भागाकडे जाणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असते. त्यात डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागांतून झटपट जाण्याचा मार्ग म्हणजे कोपर उड्डाणपूल आहे. ठाकुर्ली रेल्वे फाटकाजवळ अनेक वेळा फाटक अर्धा तास उघडले जात नाही. त्यामुळे बहुतांशी वाहनचालक कोपर उड्डाणपुलावरून पश्चिम भागात जाणे पसंत करतात. कोपर पुलावर बोअरिंगची गाडी बंद पडल्याने संध्याकाळी वाहनांची गर्दी वाढली. तशी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. या कालावधीत वाहतूक पोलिसांनी सात ते आठ रुग्णवाहिकांना दुतर्फा वाहनांची गर्दी असूनही मोकळा रस्ता उपलब्ध करून दिला.

दुचाकींची डोकेदुखी.. अन् पोलिसांची कसरत..

डोंबिवली पश्चिमेत कुपनलिका (बोअरिंग) खोदायचे साहित्य घेऊन अवजड वाहन पूर्व भागात नेण्यात येत होते. कोपर उड्डाणपुलाच्या चढावावरून जात असताना ते बंद पडले. सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडला. कोपर पुलावर एकजरी वाहन बंद पडले तरी मोठी कोंडी होत असते. त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत वाहतुकीवर दिसून येतो. हा बिघाड मोठा असल्याने बाजूच्या कार्यशाळेतील तंत्रज्ञ आणूनही उपयोग झाला नाही. पुलाच्या मधोमध गाडी बंद पडल्याने, संध्याकाळच्या वेळेत गर्दीचे काय करायचे या चिंतेने वाहतूक पोलीस अस्वस्थ झाले. त्यात पश्चिम विभागाचे वाहतूक विभागाचे प्रमुख रजेवर होते. डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत नगराळे यांनी वाहतूक पोलीस, सेवकांची फौज पूर्व भागातील केळकर, टंडन रस्ता, दत्तनगर चौक, बाजीप्रभू चौक, पश्चिमेतील दीनदयाळ चौक, शास्त्रीनगर, साऊथ इंडियन शाळेजवळ तैनात केली. पूर्व-पश्चिम भागातून ये-जा करणारी वाहने एक दिशा पद्धतीने सोडली जात होती. संध्याकाळी सहा वाजल्यापासून पोलिसांची वाहने सोडण्याची कसरत सुरू झाली होती. दुचाकीस्वारांची डोकेदुखी पोलिसांना त्रास देत होती. त्याला आवार घालत रुग्णवाहिकांना रस्ता देत वाहतूक पोलिसांनी रात्री बारा वाजेपर्यंत कोपर उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचा किल्ला लढविला.