बदलापूर स्थानकात संयुक्त मोजणीनंतर खासगी जागा संपादित करण्याचे संकेत

बदलापूर रेल्वे स्थानकावरील गेल्या काही वर्षांतील प्रवासी संख्या लक्षात घेता फलाट एकच्या बाजूला ‘होम प्लॅटफॉर्म’ उभारणीचा प्रस्ताव विचाराधीन होता. या संदर्भात पहिल्यांदा याची मोजणी करण्यात आली; मात्र या फलाटासाठी जागेची कमतरता भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातील काही जागा खासगी मालकीची आहे. त्यामुळे ती संपादित करण्यासाठी मोठा कालावधी जाण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक-१ आणि २ हे सर्वाधिकवर्दळीचे आहेत. त्यामुळे येथे प्रवाशांची मोठी गर्दी असते. अरुंद जिन्यांमुळे प्रवाशांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. यासाठी ‘होम प्लॅटफॉर्म’ उभारणीचा प्रस्ताव समोर आला. रेल्वेने त्याबद्दलचा आराखडा तयार केला; मात्र यासाठी पालिकेच्या हद्दीतील किती जागा हवी, याबाबत स्पष्टता नाही. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने प्रत्यक्ष एकत्रित पाहणीची मागणी केली होती. त्यानंतरही ही मोजणी होत नसल्याने फलाट उभारणीचा प्रश्न अधांतरीच होता; मात्र कल्याण-कर्जत-कसारा प्रवासी संघटनेच्या वतीने तात्काळ मोजणीची मागणी केल्यानंतर ती पार पडली. रेल्वेच्या आराखडय़ानुसार २१० मीटर रुंद फलाटासाठी रेल्वेची जागा वगळता ६०३ चौरस मीटरची जागा आवश्यक असून यात पालिकेच्या ताब्यातील आणि काही खासगी मालकीच्या जागेचाही समावेश आहे. त्याचे मोजमाप शुक्रवारी पालिका अभियंते नीलेश देशमुख, प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव, रेल्वे अभियंते ए. राय यांच्या उपस्थितीत पार पडले. आठ ते दहा मीटर जागा फलाटासाठी आवश्यक असल्याचे रेल्वे अभियंता राय यांनी सांगितले.

होम प्लॅटफॉर्मची दोन मीटर जागा ही पालिकेच्या हद्दीतील असल्याने तसा प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. विकास आराखडय़ातील रस्ता सोडून हा फलाट झाल्यास भविष्यातील कोंडी टाळता येईल,

नीलेश देशमुख, अभियंता बदलापूर पालिका