भ्रष्टाचारासंबंधी तक्रार करू नये यासाठी शिवसेना नगरसेवकाला १ कोटी रुपयांचे आमिष

वसई-विरार महापालिकेतील प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. आपल्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी करू नये म्हणून नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांनी शिवसेना नगरसेवकास १ कोटी रुपयांची लाच देऊ केली होती. गुरुवारी रात्री त्यातील २५ लाखांची लाच देताना रेड्डी यांना अटक करण्यात आली. पालिका अधिकाऱ्याला लाच देताना अटक झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

यमीगणू शिवगोपाळ रेड्डी (४८) हे वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. सिडको येथून ते प्रतिनियुक्तीवर आले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना गटनेते धनंजय गावडे यांनी न्यायालयात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी केल्या होत्या. आपल्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील म्हणून रेड्डी यांनी गावडे यांच्याशीे संपर्क करून तक्रारी न करण्याची विनंती केली होती. मात्र गावडे यांनी त्यांच्या विरोधात माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवून तक्रारी करणे सुरू ठेवले होते. गावडे जुमानत नसल्याने रेड्डी यांनी गावडे यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे गावडे यांनी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे रेड्डी यांच्याविरोधात तक्रार केली होती. लाचेच्या रकमेचा २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेण्यासाठी रेड्डी यांनी गावडे यांना घोडबंदर येथील वाइन अ‍ॅण्ड डाइन हॉटेलात बोलावले होते. तेथे सापळा लावून २५ लाख रुपये देताना रेड्डी यांना अटक करण्यात आली.

अटक केल्यानंतर लगेचच नालासोपारा एव्हरशाइन नगर येथील गीता टॉवरमधील रेड्डी यांच्या घराची झडती घेण्यात आली. तिथे दोन लाख रुपयांची रोकड, नवी मुंबई, बोरीवली आणि वसई येथील तीन आलिशान सदनिकांची कागदपत्रे आढळून आली. विशेष म्हणजे रेड्डी यांनी स्वत:च्या नावावर सोने, वाहन किंवा बँक लॉकर घेतलेले नव्हते. शुक्रवारी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेतील रेड्डी यांच्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी सुरू केली होती.

हा मजला प्रतिबंधित करण्यात आला होता. रेड्डी हे गेल्या सात वर्षांपासून वसई-विरार पालिकेत सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने तळ ठोकून आहेत. त्यांच्या बदलीची अनेक वेळा मागणी आणि तक्रारी करण्यात आल्या होत्या. प्रतिनियुक्तीवरील रेड्डी यांच्यासह अनेक अधिकारी पालिकेत तळ ठोकून असल्याचे वृत्त नुकतेच ‘लोकसत्ता वसई-विरार’ने दिले होते.

रेड्डी हे वसई-विरार पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हिमनगाचे एक टोक आहे. मला त्यांनी १ कोटी रुपये देऊन स्वत:चा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या सर्व भ्रष्ट व्यवहाराची इत्थंभूत माहिती मी लवकरच कागदपत्रांसह जाहीर करणार आहे.

– धनंजय गावडे, शिवसेना गटनेते, वसई-विरार महापालिका