ठाणे न्यायालयाकडून शिक्षा
नवी मुंबई येथील कोकण भवनमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश धर्मा सोनावणे याला दहा हजारांची लाच घेतल्याच्या गुन्ह्य़ात ठाणे न्यायालयाने एक वर्षे कैद तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २००६ मध्ये दहा हजारांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले होते. गेल्याच आठवडय़ात लाचप्रकरणात भिवंडीतील पोलीस उपनिरीक्षकाला शिक्षा झाली होती. पाठोपाठ आता अभियंता सोनावणे याला शिक्षा झाली आहे.
नवी मुंबई येथील कोकण भवनमधील सार्वजनिक बांधकाम विभागात सुरेश धर्मा सोनावणे हा अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत होता. तक्रारदाराला त्याच्या संस्थांचे नूतनीकरण करायचे होते आणि त्यासाठी सुरेश सोनावणे याने त्यांच्याकडे दहा हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानुसार या विभागाच्या पथकाने सापळा रचून त्याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. २८ ऑगस्ट २००६ रोजी पथकाने ही कारवाई केली होती. याप्रकरणी सुरेश सोनावणे विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सविस्तर तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डी. एस. दातार यांनी केला होता. या खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयाचे विशेष न्यायाधीश वलीमोहम्मद यांच्या न्यायालयात सुरू होती. सरकारी वकील हेमलता देशमुख यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला. दरम्यान, न्यायालयात सादर करण्यात आलेले साक्षी पुरावे ग्राह्य़ मानून न्यायाधीश वलीमोहम्मद यांनी सुरेशला शिक्षा सुनावली.
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे सहा महिने कैद व पाचशे रुपये दंड व दंडाची रक्कम भरली नाहीतर, एक महिन्याची कैद आणि कलम १३ (२) अन्वये एक वर्षे कैद व पाचशे रुपये दंड आणि दंड भरला नाहीतर एक महिना कैद अशी शिक्षा सुनावली आहे.