विनाविलंब बांधकाम परवानगी मिळाल्यास ग्राहकांनाही फायदा देण्याचा दावा
इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे त्याचा फायदा बिल्डरांसह ग्राहकांना होऊ शकेल, असा दावा बांधकाम व्यावसायिकांकडून केला जात आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार इमारत उभारणीसाठी परवानग्यांची प्रक्रिया साठ दिवसांत पूर्ण झाली तर ग्राहकांना सुमारे १० ते १५ टक्के स्वस्त दरामध्ये घरे उपलब्ध होऊ शकतील, असा अंदाज महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या ठाणे युनिटचे (एमसीएचआय- क्रेडाय ठाणे) अध्यक्ष अजय अशर यांनी सोमवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
ठाणे शहरात आयोजित मालमत्ता प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी एमसीएचआय- क्रेडाय ठाणेच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अजय अशर यांनी प्रदर्शनाची माहिती देत असताना हा अंदाज वर्तविला. इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो आणि त्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू होते. बांधकाम परवानग्या मंजूर प्रक्रियेस उशीर झाल्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढतो आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडतो. बांधकामासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या साठ दिवसांत मिळाल्या तर प्रकल्प लवकर सुरू होतील आणि त्याचा फायदा ग्राहकांना निश्चितच मिळेल, असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या निर्णयामुळे बिल्डर समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इमारत बांधकाम परवनागी प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान तसेच पारदर्शक व्हावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६१ परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परवानग्यांची संख्या ११९ वरून ५८ वर आली असून या निर्णयामुळे घरांचे दर १० ते १५ टक्के दराने स्वस्त होऊ शकतील. त्यामुळे या निर्णयाचा फायदा बिल्डरांनाच नव्हे तर ग्राहकांना होऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

ढोकाळीला प्रदर्शन..
ठाणे येथील ढोकाळी परिसरातील हायलँड गार्डन भागात महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या वतीने मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन येत्या १५ ते १८ जानेवारीदरम्यान करण्यात आले आहे.
’ या प्रदर्शनात सुमारे तीनशेहून अधिक प्रकल्पांचे स्टॉल असतील.
’ भिवंडी, पुणे, नाशिक, रायगड भागातील ‘सेकंड होम’चे पर्यायही ग्राहकांना पाहायला मिळतील.
’ प्रदर्शनासाठी तीस रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.