ठाणे शहरातील नौपाडा भागात सोमवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी आहेत. या इमारतीचे नाव ‘कृष्णा निवास’ असे आहे.
इमारतीच्या ढिगा-याखाली अडकलेल्यांपैकी काही रहिवाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही काही लोक ढिगा-याखाली अडकले असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सुभाराव पांडुरंग भट (५४), मीरा रामचंद्र भट (५८), रश्मी रामचंद्र भट (२५), अरुण दत्तात्रय सावंत (६२), प्रिया अमृतलाल पटेल (१४), भक्ती खोत-सावंत (३२), अनया अमित खोत (०७), रामचंद्र पांडुरंग भट (६५), मंदा अरविंद नेने (७०) यांचा समावेश आहे.
अरविंद नेने (८०), अमृतलाल पटेल (३५), आशा अमृतलाल पटेल (३०), रमेशचंद्र गजाजी मीना (१८), मोहन देवजी मिना (२०), शंकर खेनजी मिना (४०), अमित खोत (३४) हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ठाणे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्य सुरु आहे. ५० वर्षे जुनी असलेल्या या इमारतीला ठाणे महानगरपालिकाने धोकादायक घोषित केलेले होते. तरीही या इमारतीमध्ये काही कुटुंब राहत होती.
जमीन मालकाने १५ वर्षांपूर्वीच ही जमीन विकसित करण्यासाठी बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला. मात्र, जमीन मालकाच्या घरातील वादामुळे इमारत रिकामी करण्यात आली नाही आणि त्याचे विकसन लांबणीवर पडले. या इमारतीमध्ये पाच कुटुंबे वास्तव्याला होती. मात्र, एका कुटुंबामध्ये सोमवारीच काही नातेवाईक राहायला आले होते. त्यामुळे ते देखील या दुर्घटनेमध्ये सापडले.