प्रायोगिक तत्त्वावर दहा बसगाडय़ा सुरू करण्याचा प्रस्ताव; आयुक्त संजीव जयस्वाल यांची माहिती
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील बससेवेचा पुरता बोऱ्या वाजला असताना महापालिका प्रशासनाने शहरातील विविध मार्गावर विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात प्रयोगिक तत्त्वावर दहा बसेस सुरू करण्याचे ठरविण्यात आले असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. देशात बंगळुरू तसेच नागपूर शहरात विजेवर धावणाऱ्या बसेस प्रवासी सेवा पुरवीत आहेत. तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने वांद्रे-कुर्ला संकुलातील अंतर्गत वाहतुकीसाठी हा पर्याय पुढे आणला आहे.
विजेवर धावणाऱ्या एका बसचा खर्च अंदाजे सव्वा कोटी रुपयांच्या आसपास आहे. महापालिकेला हा खर्च परवडणार नाही. त्यामुळे खासगी कंपनीमार्फत ही सेवा सुरू केली जावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. मार्ग निश्चित करून दिल्यानंतर बसभाडय़ाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न संबंधित कंपनीला देण्याचा पर्याय पुढे आणण्यात आला असून बसवरील जाहिरातीच्या उत्पन्नाचा ५० टक्के हिस्सा मात्र महापालिकेला मिळावा, असा प्रस्ताव आहे. ठाणे शहरात घोडबंदर ते रेल्वे स्थानकावर मोठय़ा प्रमाणावर खासगी बसेस धावतात. यापैकी बहुतांश बसेसना परिवहन विभागाचा वाहतूक परवानाही नाही. अशा प्रकारच्या वाहतुकीवर कोणतेही नियंत्रण नसताना खासगी कंपनीमार्फत विजेवर चालणाऱ्या बसेस चालविल्या गेल्या तर प्रवाशांना वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होईल, असा दावाही जयस्वाल यांनी केला. येत्या काळात ठाणे शहरात किमान १०० इलेक्ट्रिक हायब्रिड बसेस धावाव्यात, असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या बसेससाठी महापालिकेमार्फत आगार तसेच चार्जिग केंद्र उभारून दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी होणारा खर्च संबंधित कंपनीवर टाकला जाणार नाही. या बसेस कोणत्या मार्गावर धावतील यासंबंधीचे मार्ग निश्चित करण्यात आलेले नाहीत. तिकीट दर मात्र परिवहन विभागाने आखून दिलेल्या दरपत्रकानुसारच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर यासंबंधीची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.
* बसेससाठी महापालिकेमार्फत आगार तसेच चार्जिग केंद्र उभारून दिले जातील ’बसभाडय़ाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न संबंधित कंपनीला देण्याचा पर्याय
* देशात बंगळुरू तसेच नागपूर शहरात विजेवर धावणाऱ्या बसेस सध्या कार्यरत