साऊथ इंडियन असोसिएशन संस्थेचे आयोजन
‘व्यवसायातील उदयोन्मुख ट्रेण्ड्स : समस्या, संधी आणि आव्हाने’ या विषयावर डोंबिवलीच्या ‘द साऊथ इंडियन असोसिएशन संस्थे’च्या वाणिज्य, बँकिंग आणि विमा विभागाच्या वतीने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नेरळच्या एआयसीएआर बिझनेस स्कूलचे डॉ. शशिधरन के. कुट्टे उपस्थित होते.
कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी बुद्धिचातुर्याची गरज असते. त्याच्या आधारे व्यवसायामध्ये वृद्धी करण्याबरोबरच व्यवसाय विकासही साध्य करता येतो, अशी यशस्वी व्यावसायिकतेची सूत्रे उपस्थितांसमोर व्यक्त केली. आर्थिकविषयक नवकल्पना आणि विविध जोखमींची माहिती देण्याबरोबरच बाजारपेठेतील परिस्थिती, समाज आणि शासनाच्या धोरणांमुळे यावर पडणारा प्रभाव, त्यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. व्यावसायवाढीच्या दृष्टीने प्रभावी वक्तृत्व आणि उत्तम संवादकौशल्याची गरज त्यांनी असल्याचे त्यांनी सांगितले.
नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिट लिमिटेड (एनएसडीएल)चे उपाध्यक्ष मनोज साठे यांनी एनएसडीएलच्या कामकाजाची माहिती दिली. संपत्तीची ओळख, संपत्ती विवरण या विषयांवरील सरकारचे लक्ष आणि प्रयत्नांमुळे आर्थिक क्षेत्रांमध्ये झालेल्या सुधारणांचे महत्त्व सांगितले. आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता, भारतातील बँकिंग क्षेत्रातील व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग आणि मानव संसाधन व्यवस्थापनच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राला पुरवल्या जाणाऱ्या संसाधनांचा वेध त्यांनी घेतला.
आयटीएम एसआयए स्कूलचे प्रा. किशोर मुर्श्ीफ यांनी बँकांचे संपत्ती व्यवस्थापन, बँकिंग क्षेत्रातील उत्क्रांती, निरनिराळ्या बँकांचे विसर्जन आणि बँकिंग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर भर दिला. मानव संसाधन व्यवस्थापक असणाऱ्या अरुण सुकुमार कायमल यांनी मानव संसाधन क्षेत्रवाढीस आवश्यक असणाऱ्या सामाजिक बुद्धिमत्तासह संगणकीय विचारप्रणाली आणि आभासी सहयोग यांच्या विषयांची माहिती दिली.
माध्यम क्षेत्रातील शिवानी गाला यांनी डिजिटल मार्केटिंगच्या जलद विकासावर मते मांडली. त्याचप्रमाणे त्यांनी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील सात महत्त्वांच्या मुद्दय़ांचे विवेचन या वेळी केले.
या वेळी अकाऊंटिंग, बँकिंग आणि फायनान्स, बिझनेस मॅनेजमेंट आणि मार्केटिंग व्यवस्थापन या विषयांवरील संशोधन पत्रिकेचे वाचन करण्यात आले. के. जे. सोमय्या महाविद्यालय विभागाच्या वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. स्मित परांजपे, एसआयईएस महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शांती सुरेश, मोतीलाल जवाहरलाल महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या प्रा. डॉ. एस. सुरेखा हे या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संचालक रविशंकर प्रसाद, बँक ऑफ महाराष्ट्र परेल शाखेचे शाखा व्यवस्थापक मंगेश रेगे उपस्थित होते.