भरबाजारपेठेत व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
विरारमधील तांदळाचे प्रसिद्ध व्यापारी अशोक शहा (४९) यांची रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी शहा यांच्याकडील सुमारे आठ लाख रुपयांची रोकड लुटून नेली. मुंबईतल्या एका सराईत गुंडाने ही हत्या आणि लूट केल्याचे स्पष्ट झाले असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
अशोक शहा (४९) हे वसई-विरारमधील तांदळाचा घाऊक विक्री करणारे व्यापारी होते. विरार पूर्वेच्या चंदनसार येथील बाजारात त्यांचा तांदूळ विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकानातून बाहेर पडले. दिवसभरात जमलेली ८ ते १० लाख रुपयांची रोकड त्यांनी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरली होती. अ‍ॅक्टिवा गाडीच्या डिक्कीत ते ही रोकड असलेली पिशवी ठेवत असताना दोन इसमांनी अचानक झडप घालून ही रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकाराने ते भांबावले, पण त्यांनी रोकड देण्यास
नकार दिला. त्या वेळी झालेली बाचाबाची पाहून त्यांच्यासोबत असलेली त्यांची भाची हीना पारेख, अमिता सोनी आणि एक कर्मचारी मदतीला आले. हल्लेखोरांनी या कर्मचाऱ्याला बंदुकीच्या दट्टय़ाने ढकलेले. शहा यांनी हल्लेखोरांचा प्रतिकार करत पैशांचीे बॅग देण्यास नकार दिल्याने त्यापैकी एकाने बंदुकीतून शहा यांच्यावर अगदी जवळून गोळी झाडली. गोळी पाठीतून शिरून थेट छातीतून बाहेर पडली. हल्लेखोर पल्सर गाडीवरून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून फरार झाले. जखमी शहा यांना सुरुवातीला विरारच्या संजीवनी रुग्णालयात आणि नंतर जेजे रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रात्री हल्ल्याचे वृत्त समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आम्ही प्रत्यक्षदर्शी हीना पारेख आणि अमिता सोनी यांनी दिलेल्या वर्णनावरून हल्लेखोरांचे रेखाचित्र तयार केले असून त्यांनी पकडण्यासाठी विशेष पथके बनविल्याची माहिती वसईचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नरसिंह भोसले यांनी दिली. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे त्यांनी सांगितले.

सराईत टोळीकडून गोळीबार
चोरी आणि हत्येचा कट पूर्वनियोजित असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हल्लेखोर दोन मोटारसायकलींवरून आले होते. त्यापैकी दोन जण एका मोटारसायकलीवर, तर अन्य तिघे जण दुसऱ्या मोटारसायकलीवर होते. हल्लेखोराची ओळख पटवली असून तो मुंबईतला सराईत गुंड आहे. वसईतसुद्धा त्याच्या नावावर गंभीर गुन्हे आहेत. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले.

सीसीटीव्ही बंद, निष्काळजीपणा नडला
विरार पूर्वेला असलेल्या चंदनसार येथे तांदळाची बाजारपेठ आहे. तिथे शहा यांचे दुकान होते. ते दररोज रात्री दिवसभराचा गल्ला जमा करून अ‍ॅक्टिवा दुचाकीवरूनआपल्या घरी जायचे. हल्लेखोरांना या सर्व गोष्टी माहीत होत्या.
दररोज एवढय़ा रकमेची उलाढाल होत असताना सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आदी प्राथमिक सुरक्षेचे उपाय केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.