पावसाळा संपला की फुलपाखरांच्या मीलनाचा काळ सुरू होतो, त्यामुळेच वसईत हिरव्यागार वनराईत विविधांगी फुलपाखरे भिरभिरताना दिसून येत आहेत. वसईच्या गावरान भागात, पाणथळ जागी, डोंगररांगामध्ये सध्या विविधरंगी फुलपाखरे आढळून येत असून, पर्यटक याचा आनंद घेत आहेत.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या वसईत अमाप जीवसृष्टी आहे. सध्या वसईतील वनांमध्ये फुलपाखरांची मांदियाळी दिसून येत आहे. हिरवाईच्या कुशीत या फुलपाखरांना पाहण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने येत आहेत, त्याशिवाय रंगबिरंगी फुलपाखरू आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी छायाचित्रकारांचीही गर्दी होत आहे. ग्रे पॅन्सी, यलो पॅन्सी, चॉकलेट पॅन्सी, पिकॉक पॅन्सी, ब्लू पॅन्सी, लेमन पॅन्सी, क्रिस्मन रोझ, कॉमन रोझ, कॉमन ब्लू बॉटल, लाइम बटरफ्लाय, प्लॅन टायगर, कॉमन सेलर, ब्लू मॉरमन , कॉमन क्रो इत्यादी प्रकारची फुलपाखरे वसईत आढळून येतात. यापैकी ब्लू मॉरमन हे फुलपाखरू महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले आहे. वसईतील तुंगारेश्वरच्या भटकंतीत हे फुलपाखरू नेहमीच नजरेत पडते. काळसर वेल्व्हेट पंखाचे हे फुलपाखरू बघण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी वसई परिसरात येतात. वसई किल्ला, पेल्हार धरणालगतचे जंगल, पापडखिंड या परिसरातही फुलपाखरे मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहेत.

शहरीकरणाचा विपरीत परिणाम

नैसर्गिक वारसा, अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक, जैवविविधतेचे निर्देशक, सौंदर्य व निसर्ग पर्यटनातील आकर्षण म्हणून फुलपाखरे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. परंतु शहरीकरणामुळे होत असलेली जंगलतोड, वृक्षतोड यांमुळे फुलपाखरांच्या संख्येवर आणि प्रजातींवर विपरीत परिणाम करतील, अशी भीती सचिन मेन यांनी व्यक्त केली.

फुलपाखरांचे जीवनचक्र अंडी, सुरवंट, कोशित आणि प्रौढ या चार अवस्थांमध्ये पूर्ण होते. सुरवंट अवस्थेमध्ये फुलपाखरांची वाढ सर्वाधिक होते. ही अवस्था फार खादाड असते. त्यांच्या खाद्य वनस्पती ठरलेल्या असतात. त्या पावसाळ्यात उपलब्ध होत असल्याने आणि कोषावस्थेत रूपांतर होताना सुरवंटाला गर्द पानांमध्ये वा फांदीखाली सुरक्षिततेसाठी लपावे लागते म्हणून या काळात फुलपाखरे मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहेत.

सचिन मेनपक्षी अभ्यासक