शहरी भागात प्रदू्षणामुळे पर्यावरण धोक्यात येऊ लागल्यानंतर झुरळ, डास आणि माश्यांचा प्रादुर्भाव वाढला आणि सुंदर बागेत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बागडणारी रंगीबेरंगी सुंदर फुलपाखरे दिसेनाशी झाली. अस्तित्वाने अतिशय लहान असणारा हा कीटकवर्गीय जीव निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र आपले सुदैव असे की अजूनही अनेक निसर्गरम्य ठिकाणी फुलपाखरे आपले अस्तित्व टिकवून आहेत. सह्य़ाद्रीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या एकूण ३३३ पैकी ठाणे परिसरात फुलपाखरांच्या शंभरएक प्रजाती आढळतात. त्या फुलपाखरांची ओळख आणि त्यांचे महत्त्व विशद करणारे हे नवे सदर..

कीटक मानवाच्या फार फार पूर्वीपासून पृथ्वीवर वावरत आहेत. कीटकांचे अस्तित्व सुमारे ३०-४० कोटी वर्षांपासून या ग्रहावर आहे. अर्थात त्या वेळचे कीटक आणि आत्ताचे कीटक यामध्ये खूपच फरक आहे. उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे बदल होत गेले. माणसाने गाठलेली विज्ञानामधील प्रगती, लोकसंख्या यांच्या जोरावर आपण एक विधान नेहमी करतो की, या जगावर माणसांचे राज्य चालते, पण जगातील कीटकांच्या संख्येचा अंदाज जरी आपण बांधला तरी आपल्याला खरं काय आहे ते कळेल. म्हणजे बघा, भारताची लोकसंख्या १२० कोटी इतकी आहे आणि कीटकांच्या नुसत्या जाती-प्रजाती या १०० कोटींपेक्षा जास्त असाव्यात असा शास्त्रज्ञांचा एक अंदाज आहे. प्रत्येक जातीचे काहीशे कीटक आहेत असं जरी गृहीत धरलं तरी केवढी मोठी कीटकसंख्या होईल पाहा. कीटक असा शब्द जरी उच्चारला तरी सर्वात आधी आठवतात ते झुरळ, डास, माश्या असे उपद्रवी कीटक की ज्यांना बघितल्यावर ते नकोसे वाटावेत. पण कितीतरी लोकांना हे सांगूनही खरं वाटणार नाही की सुरेख दिसणारी, बघत राहावीशी वाटणारी फुलपाखरं हीसुद्धा कीटकच आहेत.
आपल्या मोहक रंगसंगतीमुळे आणि फुलांवरती भिरभिरण्याच्या सवयीमुळे फुलपाखरं आपलं लक्ष हमखास वेधून घेतात. मोकळ्या माळरानाप्रमाणेच गर्दीने गच्च भरलेल्या शहरांच्या अगदी छोटय़ा बागांमध्येसुद्धा फुलपाखरं बघायला मिळतात. संपूर्ण जगामध्ये फुलपाखरांच्या १८ हजारांहून अधिक प्रजाती आहेत. भारतामध्ये १५०० प्रजाती आढळतात तर जैवविविधतेसाठी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या सह्य़ाद्री किंवा पश्चिम घाटामध्ये फुलपाखरांच्या ३३३ प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत. कीटक कुळामधील ‘लेपिडोपतेरा’ गटामध्ये फुलपाखरं गणली जातात. याच गटामधील पतंग आणि फुलपाखरं यांमध्ये नेहमी गल्लत केली जाते. पटकन बघताना हे दोन्ही कीटक सारखेच वाटतात. पण त्यामध्ये अनेक फरक आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे फुलपाखरं दिवसा सूर्यप्रकाशात वावरतात तर पतंग रात्री फुलपाखरं बसल्यावर आपल्या पखांची उघडझाप करत राहतात. पतंगांच्या पंखांवर लव असते, तर फुलपाखरांच्या पंखांवर ती नसते. हे सर्व फरक बारीक निरीक्षण केल्यास कळतात. फुलपाखरांचे वर्गीकरण सर्वसाधारणपणे पाच प्रकारांत केले जाते.
या प्रत्येक प्रकाराची काही वैशिष्टय़े असतात. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील भागांमध्ये घेणारच आहोत. फुलपाखरांचं अस्तित्व हे निसर्गामध्ये महत्त्वाचं असतं. फुलपाखरं आपल्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर आपला प्रभाव निसर्गावर आणि वनस्पतींवर टाकत असतात. फुलपाखरांच्या जीवनामध्ये एकूण ४ अवस्था असतात. अंडी, अळी, कोष आणि प्रौढावस्था.
फुलपाखरांच्या अळ्या, ज्यांना आपण सुरवंट म्हणतो, या फक्त विशिष्ट अशा झाडांचीच पाने खातात. म्हणजे एखाद्या प्रकारच्या फुलपाखरांच्या अळ्या/सुरवंट आपल्याला शोधायचे असतील तर काही ठरावीक झाडेच शोधली तरी पुरतात. उदाहरणच द्यायचं झालं तर लेमन बटरफ्लाय या फुलपाखराचं देता येईल. नावाप्रमाणेच ही फुलपाखरं लिंबूवर्गीय झाडांवरच आपली अंडी घालतात. फुलपाखरांच्या अळ्या अतिशय खादाड असतात. त्या भरभर वाढत जातात. पूर्ण वाढीनंतर आपल्याच शरीरामधून बाहेर पडणाऱ्या घामाचा कोष स्वत:भोवती विणून या अळ्या सुप्तावस्थेत जातात. या कोष अवस्थेमध्ये अळीचं स्वरूप पूर्णपणे पालटतं. या अळीला पंख फुटतात आणि कोष फोडून ही फुलपाखरं बाहेर येतात. अगदी किंचित काळ स्तब्ध राहून पंखांमध्ये ताकद आली की, अलगद हवेत झेपावतात.
अळी अवस्थेमध्ये फुलपाखरं झाडांची पाने खाऊन त्यांचं नुकसान करतात. पण याच अळ्या फुलपाखरांमध्ये रूपांतरित झाल्या की परागीभवनाचं महत्त्वाचं काम करून सर्व हानी भरून काढतात.
फुलपाखरं, मधमाश्या, इतर काही कीटक परागीभवन इतक्या नेटाने करतात की, त्यांच्याशिवाय आपल्या जेवणामधील कितीतरी अन्नपदार्थ आपल्याला मिळणारच नाहीत.
अमेरिका खंडामध्ये आढळणारी अमेरिकन मोनार्च जातीची फुलपाखरं कॅनडापासून मेक्सिकोपर्यंत सुमारे ३००० कि.मी.चा प्रवास दर वर्षी करतात आणि त्यांची पुढची पिढी बरोब्बर उलटा प्रवास करून मूळस्थानी येते. एवढय़ा मोठय़ा अंतराचा प्रवास थव्याथव्याने करताना ते फारच थोडय़ा वेळा थांबतात. याशिवाय आंतरदेशीय स्थलांतरही फुलपाखरांमध्ये पाहायला मिळतं. थंड प्रदेशामध्ये थंडीत फुलपाखरं डोंगराळ प्रदेश सोडून सपाटीवर येतात, तर उन्हाळ्यामध्ये उंच पर्वतरांगांचा आधार घेतात. सह्य़ाद्रीमध्येही असे स्थलांतर पाहायला मिळते. विशेषत: पावसाळ्यात माळरानांवर फुलपाखरं येतात तर उन्हाळ्यात थंड ठिकाणी ती आसरा शोधतात.
कोवळ्या उन्हामध्ये आपले पंख उघडझाड करत सूर्याची ऊर्जा साठवताना आणि ओलसर जागांवरील पाणी शोषून घेताना थव्यांनी बसलेली फुलपाखरं नेहमी बघायला मिळतात. कोवळ्या उन्हात बसणारी फुलपाखरं दुपारची कडक उन्हं मात्र टाळतात आणि अशा वेळी गर्द झाडीमध्ये निवारा शोधतात.

Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
Uran, Mango Trees Burn, Forest Fire, chirner, Farmers, Demand Compensation, Hundreds of Trees, marathi news,
उरण : जंगलातील आगीमुळे आंब्याच्या झाडांची राख
Dahanu, Fishermen, Catches, Ghol Fish, Worth Lakhs, Valuable, sea, marathi news,
डहाणूच्या मच्छीमारांच्या जाळ्याला लाखोंचा घोळ