समुद्रकिनारीची कोकणपट्टी काजू, आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. कोकणाबरोबरच सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगामध्ये पार तळाला केरळपर्यंत पडणारा दमदार पाऊस, दमट उबदार हवा या वृक्षांना मानवते. म्हणूनच इथल्या पर्जन्यवनांमध्ये हे सदाहरित वृक्ष हमखास सापडतात. यातला गमतीचा भाग म्हणजे काजू हे परदेशातून भारतात आणलेलं झाड आहे.

तर अशा आंबा, काजूंच्या पानावर हमखास आढळणारे सुरवंट म्हणजे कॉमन बँरन फुलपाखराचे सुरवंट. या फुलपाखराची मादी पानाच्या खालच्या बाजूस एक एक अंडं घालते. ही अंडी घुमटकार पांढरट हिरव्या/ पोपटी रंगाची असतात. यातून बाहेर पडणारे सुरवंट हे गडद हिरव्या रंगाचे असतात. त्यांच्या शरीराच्या मध्यावर डोक्यापासून टोकापर्यंत जाणारा एक पांढरट पिवळट रंगाटा पट्टा असतो. शिवाय या सुरवंटाच्या शरीराच्या दोन्ही बाजूस अंगभर लव असणाऱ्या हिरव्या रंगाच्या शेपटय़ा असतात. या शेपटय़ांच्या मध्यावरही असाच पांढरट पिवळट रंगाचा पट्टा असतो. या हिरव्या रंगाची छटा काजू किंवा आंब्याच्या पानाच्या गर्द रंगाशी मिळतीजुळती असते. शिवाय शरीरावर आणि शेपटांवर असणारे पांढरे पट्टे हे पानांच्या शिरांसारखेच दिसतात. त्यामुळे हा सुरवंट पानांवर बसला की तो ओळखूच येत नाही. त्याचं असं दिसणं हे शत्रूंपासून स्वत:चा बचाव करण्याचे उत्तम तंत्र आहे.

कॉमन बँरन हे निम्फेलिडे कुळातील मध्यम आकाराचे फुलपाखरू आहे. हे फुलपाखरू भारतीय उपखंड आणि दक्षिण आशियातील आसपासच्या प्रदेशांमध्ये सापडते. याला अपवाद फक्त शुष्क रेताड वाळवंट आणि हिमालयातील उंच पर्वत रांगा.

या फुलपाखराचे पंख हे करडय़ा रंगाचे आणि हिरवट झाक असणारे असतात. पुढच्या पंखांच्या वरच्या बाजूस तीन पोकळ काळी वर्तुळे असतात. त्याच्यापुढे पांढऱ्या ठिपक्यांची उभी माळ असते, त्याच्या पुढे फिक्कट पांढरट रंगाचा पट्टा आणि शेवटी गडद काळसर रंगाचा पट्टा अशी रचना असते. मागील पंखावर धडाच्या अगदी जवळ काळी पोकळ वर्तुळे असतात आणि त्याच्यापुढे गडद काळसर रंगाच्या चंद्रकोरीच्या दोन रांगा असतात. पुढच्या आणि मागच्या पंखांची कडा ही गडद काळसर रंगाची असते. पंखांची खालची बाजू ही फिक्कट पांढरट रंगाची असते आणि त्यावरही पोकळ काळी वर्तुळे आणि चंद्रकोरीच्या नक्षींच्या दोन रांगा अगदी उठून दिसतात.

मादी फुलपाखरांचे पंखांचे रंग फिक्के असतात. कॉमन बँरन हे शहरांमध्ये सहज दिसणारे, चपळ फुलपाखरू आहे. उन्हात ऊब घेत बसणे, जमिनीच्या ओलाव्यातून क्षार शोषून घेणे, झाडांखाली पडलेल्या कुजक्या फळांमधील स्राव शोषणे यांना फार आवडते. यांचे आयुष्य हे तीन महिन्यांचे असते.