बहुतांश एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांची धांदल; रोकड काढण्यासाठी अन्य शहरांत धाव

निश्चलनीकरणाचा निर्णय होऊन आता सहा महिने होत आले तरी बँकांमधील रोकडटंचाई अद्याप कायम आहे. बदलापूर शहरातील बहुतांश एटीएम सध्या रोकडअभावी बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांना आसपासच्या शहरांत धाव घ्यावी लागत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाला येत्या ८ मे रोजी सहा महिने पूर्ण होत आहेत. निश्चलनीकरणाच्या दोन महिन्यांनंतरच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी गेल्या दोन महिन्यांपासून एटीएममध्ये मोठय़ा प्रमाणात रोकडटंचाई जाणवत आहे. बदलापूर शहरात सुमारे शंभर एटीएम आहेत, परंतु यातील बहुतांश एटीएम गेल्या काही दिवसांपासून रोकड नसल्याने बंद आहेत. काही बँकांच्या एटीएमवर बंद असल्याचे फलक पाहायला मिळतात, तर अनेक एटीएमना पूर्णत: टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशांसाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात राष्ट्रीयीकृत बॅँकांसह सहकारी बँकांचेही एटीएम आहेत. मात्र त्यापैकी बहुतेक बंद आहेत. हीच परिस्थिती शहराच्या आतील भागांत आहे. दुसरीकडे, बँकांच्या आंतरशाखीय रोकड व्यवहारांवर शुल्क आकारणी करण्यात येत असल्याने तो पर्यायही नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारा आहे. त्यातच सध्या सुट्टय़ांचा हंगाम सुरू असल्याने बाहेरगावी किंवा पर्यटनाला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. ग्रामीण भागातील रोकडटंचाई लक्षात घेता, घरातून निघतानाच जास्त रोकड जवळ बाळगण्यावर अनेकांचा भर आहे. परंतु सध्या बदलापुरातील एटीएममध्ये खडखडाट असल्याने नागरिकांची धांदल उडत आहे. अनेक जण तर आता केवळ पैसे काढण्यासाठी आसपासच्या शहरांतील एटीएमकडे धाव घेत आहेत.

बदलापूरप्रमाणेच अंबरनाथ शहरातील विविध बँकांची एटीएम सेवाही विस्कळीत झाली आहे.