नोटाबंदीनंतर ढासळलेल्या फुलबाजारात ‘गुरुवार’ची तेजी

लगीनसराईच्या हंगामात एकीकडे फुलांची मागणी वाढली असली तरी चलनकल्लोळामुळे मुंबईच्या बाजारात फुलांची आवक कमालीची रोडावल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसू लागले आहे. आवक रोडावूनही बाजारात पुरेसे चलन उपलब्ध नसल्यामुळे भाव पडल्याने शेतकरी आणि व्यापारी हे दोन्ही घटक गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते. मार्गशीर्ष महिन्यामुळे मात्र हे गणित बदलू लागले असून गुरुवारपासून फुलांच्या बाजारात पुन्हा एकदा तेजी आली आहे.

अगदी दोन दिवसांपर्यंत मोगऱ्याच्या फुलांचा अपवाद वगळला तर सर्वच फुलांच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचा दावा विक्रेते करत होते. एरवी आवक कमी होताच सर्वच प्रकारच्या कृषिमालाचे दर वाढतात असा अनुभव आहे. या वेळी आवकही नाही आणि विक्री करायची तर चलनाचा घोळ असल्याने व्यापाराचाही बोऱ्या वाजला अशी प्रतिक्रिया फूल बाजारात उमटू लागली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून साधारण ३०-४० टक्क्यांनी फुलांचा बाजार घसरला होता. परंतु गुरुवारपासून सुरू झालेल्या मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांची मागणी पुन्हा वाढल्याने दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन आता तीन आठवडय़ांचा काळ लोटला आहे. या निर्णयाचा फटका सरसकट कृषी मालाच्या सर्वच बाजारांना बसल्याचे चित्र आहे. फुलांचा बाजारही त्यास अपवाद नव्हता.

आठ नोव्हेंबरपूर्वी २५ ते ३० रुपये विकले जाणारी गुलाबाची १२ फुले दोन दिवसांपूर्वीपर्यंत १०-१२ रुपयाने विकली जात होती, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक फूल विक्रेत्यांनी दिली. कलकत्ता गोंडा सुरुवातीला ४० रुपये किलोने विकला जात होता. मात्र, या फुलांची किंमत १५ रुपयांपर्यंत खाली घसरल्याचे चित्र होते.

मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होताच फुलांच्या किमती पुन्हा वाढल्या असून गोंडा किलोमागे ४० रुपये, शेवती ५० रुपये, गुलाब ७० रुपये बंडल तर लाल गोंडा ४० रुपये तर निशिगंध १२० रुपये किलोने विकला जात आहे. मोगऱ्याचे दर मात्र पूर्वी इतकेच महाग आहेत.

मालाची आवक घटली

शेतकरी आणि मधल्या दलालांना रोकडचिंता भेडसावू लागल्याने गेल्या काही दिवसांपासून उत्तम प्रतीची फुले येणे बंद झाल्याची प्रतिक्रिया बाजार समितीमधील घाऊक फुलांचे विक्रेते अजित पवार यांनी दिली.

ही सर्व फुले कल्याण कृषी समिती येथे नाशिक, जुन्नर-पुणे, तसेच कलकत्ता, हैदराबाद येथून आणली जातात.

गाडीमालक व चालक यांना देण्याइतपतही सुट्टे पैसे नसतात. शिवाय बँकेतून मिळणाऱ्या दोन हजारांच्या नोटा सुट्टय़ा कशा करयाच्या यामुळे दररोज सकाळी गाडी चालक-मालक, विक्रेते यांच्यामध्ये वादावादी होत आहे.

मोगऱ्याला उत्तम मागणी आहे. मात्र हंगाम नसल्याने त्या प्रमाणात मोगऱ्याचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे ८०० ते ९०० रुपये किलो या भावात मोगरा विकला जात आहे. महिन्याभरापूर्वी हाच मोगरा २००-३०० रुपये किलोने विकला जात होता. मार्गशीर्ष महिन्यात तरी फुलांचे भाव थोडे वाढतील अशी अपेक्षा आहे.

सोपान काळे , फूल विक्रेते, कृषिबाजार समिती, कल्याण