समरसता साहित्य संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांचे तरुणांना आवाहन
सध्याच्या तरुणाईने झोप मोडून वाचन केले पाहिजे, लेखणी धरून लिहिते होण्याची गरज आहे, असा संदेश १७व्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी उपस्थित तरुणांना दिले. कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी येथे भरलेल्या या संमेलनाची सांगता रविवारी झाली त्या वेळी अध्यक्षीय भाषणातून लिहिते होण्याचा संदेश देण्यात आला.
महापुरुषांच्या विचाराची विकृती करण्याचे उद्योग सुरू झाले असून त्यातून नेहरू, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोळवलकर गुरुजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील सुटलेले नाहीत. जुन्या प्रश्नांच्या भांडवलावर नवे प्रश्न निर्माण केले जात आहेत. त्यामुळे जातीय तेढ वाढविण्याचे विषय सुरू करण्याची चढाओढ सुरू झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आंबेडकर देशातील सर्वात मोठे धर्मपुरुष होते. त्यांनी लिहिलेल्या बौद्ध व त्यांचा धम्म हा भारतीय तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ आहे. आपण तो अभ्यासायला हवा. हा देश व्यास, वाल्मीकी व आंबेडकर यांनी बांधलेला आहे. बाबासाहेब हे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांनी साहित्यिकांना अंतर्मुख व्हा, असे सांगितले आहे. आपली जीवनमूल्ये, सांस्कृतिक मूल्ये आपल्या साहित्यातून प्रकट होऊ द्या. खेडय़ापाडय़ातील ज्ञानाचा अंधार दूर करा. बाबासाहेबांचा संदेश अमलात आणणे ही आजच्या तरुणांची जबाबदारी आहे. म्हणून समरसता परिषदेच्या सर्वानी ‘बौद्धिक व्हावे, विचाराची लढाई विचाराने लढावी’, अशी अपेक्षा पतंगे यांनी व्यक्त केली.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात प्रा. श्यामराव अत्रे यांनी ‘राज्यघटना नव्या युगाचा धर्मग्रंथ’ या विषयावर व्याख्यान दिले. समारोपाच्या कार्यक्रमात निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण करण्यात आला.

बाजारपेठ अर्थव्यवस्थेत जात, धर्म, पंथाला महत्त्व नाही!
पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे प्रतिपादन
कल्याण : शहरांमध्ये विकासाचा मार्ग प्रशस्त होत असल्यानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षित समाजातील तरुणांना ‘गावाकडून शहराकडे चला’ हा संदेश दिला. हा आंबेडकरांचा उद्योजकीय विचार असून त्यातून त्यांनी जात व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरामध्ये दाखल झाल्यानंतर व्यक्तीला चिकटून राहणाऱ्या जातीचे आवरण गळून पडते आणि त्या तरुणाला व्यवसाय करण्यासाठी चांगली पाश्र्वभूमी तयार होत असते. सध्याच्या काळात ही आवरणे संपुष्टात आली असून बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे त्यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. बाजारपेठ अर्थव्यवस्थेमध्ये जात, धर्म आणि पंथाला कोणतेच महत्त्व राहात नाही, असे प्रतिपादन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. समरसता साहित्य परिषद आणि श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्थेच्या वतीने कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या १७व्या समरसता साहित्य संमेलनात ते बोलत होते.