कल्याण, डोंबिवली परिसरात पक्ष्यांसाठी सिमेंटची भांडी

पक्षी, प्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या डोंबिवलीतील ‘प्लॅण्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल फॉर वेल्फेअर सोसायटी’ (पॉज) संस्थेतर्फे ठाणे, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरातील मुख्य, गल्ली-बोळातील रस्ते, पक्ष्यांचा अधिवास भागात पक्ष्यांच्या पाणी पिण्याच्या सोयीसाठी सिमेंटची भांडी ठेवली आहेत. मागील काही वर्षांत अशा प्रकारची सुमारे तीनशे भांडी विविध भागांत ठेवली असून येत्या तीन महिन्यांत अशा प्रकारची १०० वाढीव भांडी अन्य भागात ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘पॉज’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश भणगे यांनी दिली.

उन्हाळ्यात लहान-मोठे खड्डे, तळी गाळाने भरलेली असल्याने तेथील पाणी आटण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्या त्या भागात वर्षांनुवर्षे वास्तव्य करणाऱ्या पक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती न करता त्या भागातच पाणी उपलब्ध होईल म्हणून ‘पॉज’ मागील तीन वर्षांपासून ठाणे शहर परिसर, घोडबंदर रस्ता भागातील झाडे, तेथील झुडपे, ठाणे ते भिवंडीपर्यंतच्या नाशिक महामार्गाच्या दुभाजकांमधील झाडे, कल्याण-डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा या परिसरात पक्ष्यांचा अधिवास अधिक प्रमाणात असतो.

या ठिकाणी ठेवलेल्या कुंडय़ांमध्ये ‘पॉज’चे स्वयंसेवक दर दोन ते तीन दिवसांनी पाणी टाकण्याचे काम करतात. एका कुंडीतील पाणी तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस राहणार नाही याची काळजी घेतात.अशा बाहेरील पाण्यामध्ये डास अंडी घालतात. त्यामुळे अन्य आजार, पक्ष्यांना विकार होण्याची भीती असते. त्यामुळे पाणी बदलण्याची प्रक्रिया प्राधान्याने होते, असे भणगे यांनी सांगितले.

स्थानिकांना आवाहन

गेल्या तीन वर्षांत तीनशे ठिकाणांवर सिमेंट कुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. अशा कुंडय़ा कोठे दिसल्या तर आजूबाजूच्या रहिवाशांनीही पाणी टाकून तेथील वन्यजीवांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे. अशा व अन्य भागात रहिवाशांना पक्ष्यांना पाणी देण्यासाठी सिमेंटच्या कुंडय़ा हव्या असतील तर रहिवाशांना मोफत देण्याची व्यवस्था ‘पॉज’तर्फे केली आहे. संपर्क- ९८२०१६१११४.