ठाणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी, या उद्देशातून वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक मार्गात प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार, सोमवारपासून (आज) खोपट एसटी कार्यशाळेकडून जोंधळीबाग – गणेश निवास व गीता सोसायटी-चरई-तलावपाळी मार्गे ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात येणार आहे. तसेच या मार्गावरील वाहतूक एलबीएस मार्गे वळविण्यात आली आहे. हा वाहतूक बदल ३० दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली असून त्या तुलनेत शहरातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. खोपट एसटी कार्यशाळेकडून येणारी अनेक वाहने तलावपाळी आणि ठाणे स्थानक परिसराकडे जातात. मात्र, जोंधळीबाग – गणेश निवास व गीता सोसायटी-चरई हा मार्ग अतिशय जवळचा असल्याने अनेक वाहनचालक या मार्गाचा मोठय़ा प्रमाणात वापर करतात. वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून वारंवार पुढे येऊ लागली आहे. याच पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी येथील वाहतूक मार्गात प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार खोपट एसटी कार्यशाळेकडून जोंधळीबाग – गणेश निवास व गीता सोसायटीमार्गे ठाणे स्थानकाकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्यात येणार आहे. या वाहतूक बदलासंबंधी हरकती किंवा सूचना असल्यास वाहतूक शाखेच्या कार्यालयात लेखी पाठविण्याचे आवाहन करंदीकर यांनी केले आहे.

असा असेल बदल
*खोपट एसटी कार्यशाळेकडून जोंधळीबाग – गणेश निवास व गीता सोसायटीमार्गे ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना मित्तल बिल्डर कार्यालयाजवळ प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने एलबीएस मार्गे मखमली तलावासमोरील चरई क्रॉस या पर्यायी मार्गे जातील.
*मित्तल बिल्डर कार्यालय ते ओम साई मोटर्स दुकानापर्यंत जाणाऱ्या मार्गाच्या उजव्या बाजूस मनोहर पार्क व गणेश निवास सोसायटी समोरील रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी आहे.