मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जाहीर झालेले परीक्षेचे वेळापत्रक १५ दिवसांनी पुढे ढकलले आहे. त्याचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला आहे. ८ एप्रिलची परीक्षा २१ एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्याचे विद्यापीठाने अचानक जाहीर केल्याने विद्यार्थाना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तर नव्याने जाहीर झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा गोंधळ उडाला आहे. या प्रकाराने सुट्टीच्या नियोजनावरही याचा फटका बसणार आहे, अशा प्रतिक्रिया महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना व्यक्त केल्या.
मुंबई विद्यापीठाने तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ८ एप्रिल ही तारीख जाहीर झाली होती. या वेळापत्रकातही कमालीची तफावत होती. एक पेपर झाल्यानंतर १५ दिवसांची सुट्टी आणि त्यानंतर पुढील पेपर ३० ते ३५ दिवसांनी, अशी परीक्षा होणार होती. कला शाखेच्या विद्यार्थ्यांचे शिकवण्याचे १८० दिवसही पूर्ण होत नसल्याने ते वाढवण्याचा प्रश्न विद्यापीठासमोर होता.
त्यामुळे नव्याने २१ एप्रिलपासून परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात कोणत्याही उपक्रमात सहभागी होता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी खंत व्यक्त केली. तर काहींनी अभ्यासासाठी वेळ मिळणार असल्याने आनंदही व्यक्त केला.

नाटकाच्या तालमी रंगणार नाहीत  
परीक्षा लवकर संपल्याने नाटकांच्या तालमींना जाण्याचा अनेकांनी निर्णय घेतला होता. परंतु आता परीक्षाच उशिराने सुरू होणार असल्याने तालमी शक्य नाहीत. शिवाय काही विद्यार्थी मेमध्ये शिक्षणासाठीची तजवीज म्हणून तात्पुरत्या नोकरीचा विचार करतात, मात्र परीक्षेचा दिवस वाढल्याने हे यंदा शक्य होणार नाही. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षेचे वेळापत्रक पुरेसे आधीच जाहीर करणे गरजेचे आहे.
– श्रीकांत भगत, सीएचएम महाविद्यालय, उल्हासनगर
                
बरे झाले!
मुंबई विद्यापीठाकडून तडकाफडकी वेळापत्रक बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना एक प्रकारे अभ्यास करण्यास अधिक कालावधी उपलब्ध होणार आहे. त्यातच नुकताच पाचव्या सेमिस्टर (सहामाही) परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांच्या हाती आला होता; तसेच तृतीय वर्षांच्या शेवटच्या परीक्षेसोबतच पाचव्या सेमिस्टरच्या केटी विषयांची परीक्षा एकत्र असल्याने हा निर्णय विद्यार्थ्यांना लाभदायी ठरणार आहे, हे एका अर्थाने बरे झाले.
 – धनश्री शिंदे, जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे</strong>

अभ्यास लांबला
प्रत्येक वर्षी मार्च महिन्याच्या शेवटी होणारी परीक्षा यंदा एप्रिल महिन्याच्या शेवटी गेल्याने त्याचा फटका आम्हाला बसत आहे. सुट्टीत गाण्याच्या रियाजासाठी वेळ देण्याचे ठरवले होते. मात्र परीक्षेमुळे ते आता करता येणार नाही.
– प्राजक्ता धर्माधिकारी, सीएचएम महाविद्यालय, उल्हासनगर