शहरात तीव्र पाणीटंचाई असताना धरणाच्या पाण्यात छटपूजा!
वसई-विरार शहरांत तीव्र पाणीटंचाई असताना पापडिखड धरणात मंगळवारी छटपूजा केली जाणार आहे. यामुळे पिण्याचे पाणी मोठय़ा प्रमाणावर दूषित होणार आहे. पालिका प्रशासनाने विरोध केला तरी छटपूजा धरणाच्या पाण्यातच करण्याचा निर्धार छटपूजा समितीने केला आहे. शिवसेना आणि मनसे या पक्षांनी या छटपूजेविरोधात दंड थोपटले आहेत. विरोध डावलून धरणाजवळ छटपूजेची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
विरार पूर्वेला जीवदानी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पापडखिंड धरणातून शहराला दररोज एक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई असल्याने याच पाण्याचा मोठा आधार उरला आहे. मात्र तरीही विरारच्या सार्वजनिक छटपूजा समितीतर्फे याच पापडखिंड धरणात मंगळवारी आणि बुधवारी छटपूजा केली जाणार आहे. या छटपूजेमुळे धरणाचे पाणी दूषित होणार असल्याने वसई-विरार महापालिकेने परवानगी नाकारली आहे. तसेच शिवसेना आणि मनसे या पक्षांनीही या पूजेला विरोध केला आहे. या छटपूजेसाठी किमान २५ हजार लोक या ठिकाणी जमा होणार आहेत. छटपूजेसाठी धरणात अंघोळ केली जाते, तसेच तेलाचे हजारो दिवे पाण्यात सोडले जातात. निर्माल्य आणि इतर साहित्य पाण्यात सोडले जाते. एकाच वेळी हजारो लोक पाण्यात उतरत असल्याने पाणी दूषित होते, त्यामुळे आमचा या छटपूजेला विरोध असल्याचे शिवसेना शहरप्रमुख दिलीप िपपळे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी आम्ही अन्यत्र अर्नाळा समुद्रात छटपूजा साजरी करण्यासाठी बसेसची व्यवस्था केली होती. कृत्रिम तलावाचा सुद्धा पर्याय दिला होता. पण तरी धरणाच्या पाण्यातच उतरण्याचा त्यांचा हट्ट असतो असे माजी नगरसेवक आणि सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष विलास चोरघे यांनी सांगितले. शिवसेनेसह मनसेने या छटपूजेला तीव्र विरोध केला आहे. धार्मिक पूजेला, कार्यक्रमाला विरोध नाही. परंतु आमच्या पिण्याचे पाणी दूषित करणार असाल तर पूजा उधळून लावू, असा इशारा मनसेचे फुलपाडा विभाग अध्यक्ष रोहन निवेंडकर यांनी दिला आहे.
धरणाचे पाणी दूषित होणार असल्याने त्यामुळे वसई-विरार महापालिकेने या छटपूजेला परवानगी नाकारली आहे. ही छटपूजा धरणाच्या पाण्यात होऊ देणार नाही, असा आयुक्त सतीश लोखंडे यांनी ठाम पवित्रा घेतला आहे. हे पिण्याचे पाणी आहे. आम्ही त्यांना परवानगी दिलेली नाही. सध्या आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतोय. पण वेळ पडली तर पोलीस बळाचा वापर करू असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गोविंद राठोड यांनी सांगितले.
छटपूजा करणारच
आम्ही तेलाचे दिवे, निर्माल्य पाण्यात सोडणार नाही किंवा पाण्यात स्नानही करणार नाही, असे विरार सार्वजनिक छटपूजा समितीचे अध्यक्ष राकेश ठाकूर यांनी सांगितले. आम्ही पण ते पाणी पितो, त्यामुळे पाणी दूषित होणार नाही याची खबरदारी आम्हीही घेतो असेही ते म्हणाले.