‘मेक इन महाराष्ट्र’चा डंका वाजविला जात असताना मराठवाडा व विदर्भात उद्योगांना स्वस्त वीज देण्यासाठी पावले टाकण्यात आल्याने वाडा (जि. पालघर) या आदिवासी भागातील स्टील उद्योगांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याची मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी थेट राज्यपालांची भेट घेऊन केली. राज्यात सर्वच उद्योगांना विजेचे दर कमी असावेत, अशी आपली भूमिका कायमच आहे. पण ते शक्य होत नसल्यास उर्वरित महाराष्ट्रातील मागास भागातील उद्योगांनाही मराठवाडा व विदर्भाप्रमाणे लाभ व्हावा, अशी मागणी केल्याचे देसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

विदर्भ व मराठवाडय़ातील उद्योगांना कमी दरात वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. हा भाग मागास असल्याने वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुशेष दूर करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. तेथील उद्योगांच्या दरात कपात करण्यासाठी समिती नेमण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आता उर्वरित महाराष्ट्रातील उद्योजकांमध्ये नाराजी असून आपल्याला स्वस्त वीज मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

सरकारकडून भेदभाव?
मुख्यमंत्री विदर्भातील असल्याने त्या भागाला झुकते माप असल्याचा आरोप अनेकदा होतो. राज्यात ‘मेक इन महाराष्ट्र’साठी मुख्यमंत्री फडणवीस अनेक देशांमध्ये जाऊन विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर विजेचे दर विदर्भ व मराठवाडय़ापुरतेच कमी केले, तर त्याचा परिणाम अन्य विभागांमधील उद्योगांवर होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या भेदभावामुळे उद्योगांचे अन्य राज्यांमध्ये स्थलांतर होण्याची भीती आहे.