राज्य सरकारच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेचा निर्णय; दोन दिवसांत विक्रीला सुरुवात
कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपुष्टात आणून शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता यावा, यासाठी राज्य सरकारने मुंबई तसेच आसपासच्या शहरांतील मैदानांमध्ये स्वस्त भाजीची केंद्रे उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या योजनेला तातडीने प्रतिसाद देत ठाणे महापालिकेने शहरातील चार मैदाने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांत थेट शेतातला माल आणून विकण्यासाठी शेतकऱ्यांना पायाभूत सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. यावर तात्पुरता उपाय म्हणून महापालिकेच्या मालकीच्या मैदानांमध्ये भाजी विक्रीची केंद्रे उभारली जाणार आहेत.
मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना प्रामुख्याने पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ांतून भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो. याशिवाय ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर, मुरबाड अशा पट्टय़ातील स्थानिक शेतांमधूनही ठाणे, डोंबिवलीकरांना मोठय़ा प्रमाणावर भाजी येत असते. पुणे, नाशिक जिल्ह्य़ांतून येणारा भाजीपाला वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात येतो आणि त्यानंतर पुढे तो स्थानिक खरेदीदारांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचविला जातो. राज्य सरकारला बाजार समित्या मोडीत काढायच्या असल्याने शेतातला माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी नियंत्रणमुक्तीचे धोरण नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यास त्याचा शेतमाल बाजार समितीच्या आवारात आणण्याचे बंधन काढून घेण्यात आले आहे. असे असले तरी मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये घाऊक स्वरूपात भाजीपाला विकण्यासाठी पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने अजूनही मोठय़ा संख्येने भाजीपाल्याने भरलेली वाहने वाशी येथील घाऊक बाजारातच रिकामी होत असतात. मुंबई, ठाण्यास दररोज सरासरी १४०० मेट्रिक टन इतक्या प्रमाणात भाज्यांची आवश्यकता असते. नियंत्रणमुक्तीनंतरही एपीएमसीच्या वाशी बाजारात दररोज सुमारे १३०० मेट्रिक टन भाजी येत आहे. त्यामुळे सरकारच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.
या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने महापालिकेच्या मालकीच्या मैदानांमध्ये स्वस्त भाजी विक्रीची केंद्रे सुरू करता येतील का, याची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने शहरातील मैदाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. नौपाडा, वर्तकनगर आणि घोडबंदर भागातील काही मैदाने स्वस्त भाजी उपक्रमासाठी निश्चित करण्यात आली असून त्या ठिकाणी येत्या दोन ते तीन दिवसांत स्वस्त भाजीपाला केंद्रांची उभारणी केली जाऊ शकते, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.

योजना अशी..
* सकाळी ठरावीक वेळेत शेतकरी या मैदानांमध्ये भाजीपाला विक्री करतील.
* या ठिकाणी होणारा भाजीपाल्याचा कचरा शेतकऱ्यांना हटवावा लागेल अथवा पालिका त्यांच्याकडून कर घेऊन तो साफ करेल.
* ठरावीक वेळेनंतर ही मैदाने सार्वजनिक वापरासाठी, खेळांसाठी खुली राहतील.
* या योजनेमुळे ग्राहकांना स्वस्त भाजी उपलब्ध होईल.